सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदाचे वेध?

महिला मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष घेतील, असं वक्तव्य केलय राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी. गोंदियात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवती मेळाव्यात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे मत मांडलय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 13, 2012, 08:43 PM IST

www.24taas.com,गोंदिया
महिला मुख्यमंत्र्यांबाबतचा निर्णय राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष घेतील, असं वक्तव्य केलय राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी. गोंदियात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी युवती मेळाव्यात एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे मत मांडलय.
आगामी निवडणुकीत जो पक्ष जास्त ताकदीनिशी निवडमून येईल, त्याच पक्षाचा मुख्यमंत्री असेल, असं त्यांनी म्हटलय. मात्र त्याच बरोबर महिला मुख्यमंत्र्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलय. सुप्रियाताईंच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आगामी निवडणुकांमध्ये जो पक्ष सर्वात जास्त जागा जिंकेल, त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, तसेच महिला मुख्यमंत्री निवडण्याची वेळ आली, तर त्याबाबतीत प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड हे निर्णय घेतील, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सुप्रियाताईंच्या या वक्तव्यावरून आता राज्यात महिला मुख्यमंत्रीपदाचा विषय चर्चेला आला आहे. यामुळे सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत की अजित पवार यांना शह देण्यासाठी असे वक्तव्य केलंय, याची चर्चा सुरू झाली आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर, महिला मुख्यमंत्रीपदाबाबत सुप्रिया सुळे यांनी केलेलं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे. शरद पवारांचे अत्यंत्य निकटवर्ती प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.