नाशिककरांवर ३०% करवाढीचा बोजा!

नाशिक महापालिकेने नवनिर्माण करत घरपट्टीत दहा टक्के तर पाणीपट्टीत आठ टक्के असे तब्बल १८ टक्के दरवाढीचा दणका देणारे अंदाजपत्रक सादर केले आहे. यात मलनिस्सारण कर, वृक्ष कर तसच इतर करांमध्ये दुपटीने वाढ प्रस्तावित असल्याने ही करवाढ प्रत्यक्षात 30 टक्क्यापर्यंत होऊ शकते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 19, 2013, 06:20 PM IST

www.24taas.com, नाशिक
नाशिक महापालिकेने नवनिर्माण करत घरपट्टीत दहा टक्के तर पाणीपट्टीत आठ टक्के असे तब्बल १८ टक्के दरवाढीचा दणका देणारे अंदाजपत्रक सादर केले आहे. यात मलनिस्सारण कर, वृक्ष कर तसच इतर करांमध्ये दुपटीने वाढ प्रस्तावित असल्याने ही करवाढ प्रत्यक्षात 30 टक्क्यापर्यंत होऊ शकते. यामुळं नाशिकरांचे वार्षिक बजेट कोसळणार आहे.
नाशिक महापालिका प्रशासनाने १५५६ कोटी ८० लाख रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केलं आहे. गेल्या चार पाच वर्षांपासून करवाढ फेटाळली जात होती. त्यामुळे यावर्षी करवाढीचा प्रस्ताव प्रशासनानं स्थायीसमोर ठेवला आहे. मुंबई पुण्यापेक्षा घरपट्टी नाशिक शहरात खूपच कमी आहे. गेल्या वीस वर्षात पहिल्यांदाच ही वाढ असल्याचं सांगत स्थायीने ही करवाढ आवश्यक असल्याचं सांगत समर्थन केलं आहे. गेल्या दहा वर्षात कुठलीही वाढ झालेली नसल्याने वर्षाला एक टक्का या हिशोबाने ही दरवाढ सुचविण्यात आल्याचं सांगितलं जातंय.
सकृतदर्शनी हि वाढ केवळ दहा टक्के दिसत असली तरी मलनिस्सारण करात दुपट वाढ सुचविण्यात आली आहे. वृक्ष करात एक टक्का अशी अनेक छुपी करवाढ असल्यानं ही वाढ 30 टक्क्यापर्यंत जाऊ शकते. असं जाणकारांचं म्हणणं आहे. ऐन महागाईत ही वाढ झाल्यास नाशिककरांचे वार्षिक बजेट कोसळणार आहे. त्यामुळे या प्रस्तावावर नाशिककरांनी विरोध दर्शविला आहे.

नाशिकच्या विकासासाठी ही वाढ अद्याप प्रस्तावित असली तरी याबाबत नाशिककरांमध्ये नाराजी दिसून येत आहे. नवनिर्माण करण्यासाठी असलेल्या या करांसाठी स्थायी आणि महासभा काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.