www.24taas.com, झी मीडिया, धुळे
राज्यात कापसाचं सर्वाधिक उत्पादन खान्देशात होतं.. यंदा खान्देशात कापसाला चांगला दर मिळालाय. मात्र हा दर कायम राहणार का पुन्हा शेतक-यांच्या पदरी निराशा येणार अशी काळजी बळीराजाला सतावतेय...
पांढरं सोनं म्हणून नावारुपाला आलेलं कापूस हे शेतक-यांचं नगदी पीक... त्यामुळं शेतक-यांकडून कापूस लागवडीला महत्व देतात.. गेल्या वर्षी निराशा झाल्यानंतर यंदा तरी कापसाचे दर चांगले राहतील अशी आस शेतक-यांना आहे.. धरणगावला यंदा कापसाला पाच हजार आठशे रुपयाचा दर मिळाल्याने शेतक-यांमध्ये नव्या आशा पल्लवित झाल्यात.. मात्र दुष्काळामुळे मे महिन्यात कापसाची लागवड कमी झाल्यानं त्याचा परिणाम उत्पादकतेवरही होणार आहे.. अशातच सरकारने कापसाच्या निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यास कापसाचे दर कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र त्यामुळं शेतक-यांची पदरी पुन्हा एकदा निराशा येण्याची भीती व्यक्त होतेय..
सरकारनं निर्यातबंदी लादल्यास अफू, गांजा आणि भांग परिषद घेत या पिकांची लागवड करण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय.. तसंच सध्याचा कापसाला दिलेला दर समाधानकारक असला तरी फसवा आहे असा दावा शेतकरी संघटनेनं दिलाय,.
वरुणराजाची कृपादृष्टी असली तरी सरकारच्या धोरणांची चिंता शेतक-यांना सतावतेय.. चढ्या दराने कापूस विक्री सुरु असताना निर्यातबंदी लादल्यास पांढ-या सोन्याची माती होईल की काय या विवंचनेत बळीराजा सापडलाय..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.