`आप`च्याही पिंपळाला पानं तिनंच!; इथंही गटबाजी?

आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा असल्याचं दाखविण्याचा खटाटोप अरविंद केजरीवाल वारंवार करतात. असं असलं तरी या पक्षानं अद्याप बाळसंही धरलं नसताना नाशकात नाराजी, गटबाजी आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 16, 2014, 11:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा असल्याचं दाखविण्याचा खटाटोप अरविंद केजरीवाल वारंवार करतात. असं असलं तरी या पक्षानं अद्याप बाळसंही धरलं नसताना नाशकात नाराजी, गटबाजी आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. आता विजय पांढरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानं हा वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे.
आंदोलनच्या माध्यातून दिल्लीचं मुख्यमंत्रीपद काबीज करणारे आणि तितक्याच तडकाफडकी राजीनामा देवून पुन्हा रस्त्यावरील लढाई लढण्याचा एल्गार अरविंद केजरीवाल यांनी केलाय. याच आपची तरुण आणि अधिकाऱ्यांना भुरळ पडू लागली. सिंचन घोटाळा उघडकीस आणून राज्याच्या राजकारणात भूकंप घडवणारे मेटाचे मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केल्यानं नाशिकच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यात उत्साह संचारला होता. मात्र, तो औटघटकेचा ठरला. आता पक्षाला नाराजी गटबाजीनं ग्रासलंय.
नुकतीच पक्षाने आपली नवीन कार्यकारिणी जाहीर केली असून त्यातून जुन्या सदस्यांना डावलण्यात आल्यानं त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पोराटोरांच्या हाती पक्ष जात असून पक्ष आपल्या मूळ उद्देशापासून दूर जात असल्याचा आरोप `आप`चे सदस्य गिरीधर पाटील यांनी केलाय. दुसरीकडे हातात घेऊन झाडू घेऊन भ्रष्टाचाराची साफसफाई करण्याचा विडा उचलणाऱ्या  नव्या दमाच्या जितेंद्र भावे यांनी मात्र पाटील यांच्या या आरोपांच खंडण केलंय.
लोकसभा निवडणुकांसाठी आपनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. नाशिकमधून विजय पांढरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळं नाशिकच्या आपमधली ही अंतर्गत नाराजी पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. इतर पक्षापेक्षा वेगळं असल्याचा टेंभा मिरविणाऱ्या `आप`लाही गटबाजीचं ग्रहण लागल्यानं राजकारणात इतरांपेक्षा आप वेगळा नसल्याचं सध्या तरी दिसतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.