www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात घडलेली ‘ऑनर किलिंग’ची घटना ही जातपंचायतीच्या दबावामुळे घडल्याची धक्कादायक सर्वज्ञात ‘सत्य’ आता उघडपणे समोर येतंय. जोशी-भटके समाजातल्या एका मुलीनं आंतरजातीय विवाह केल्यानं तिच्या कुटुंबाला जातीबाहेर टाकण्यात आलंय. याच हिंगमिरे कुटुंबीयांनी आपली व्यथा ‘झी २४ तास’समोर व्यक्त केलीय. समाजाकडून मानसिक छळ करण्यात येत असल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत नोंदवली आहे.
नाशिकमध्ये मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग मनात धरून बापानंच आपल्या मुलीचा गळा दाबून तिची हत्या केली. धक्कादायक म्हणजे ही मुलगी नऊ महिन्यांची गरोदर होती. मुलगी प्रमिला हिची हत्या केल्याप्रकरणी तिचा बाप किसन कुंभारकर याला पोलिसांनी अटकही केलीय. पण ही हत्या नेमकी का घडली? हे सर्वज्ञात असूनही जातपंचायतीच्या दबावामुळे कुणी बोलायला तयार नाही. पण, जातपंचायतीचा हा दबाव झुगारून हिंगमिरे कुटुंबीय समोर आलेत.
‘कुंभारकर यांच्या मुलीनं जातीबाहेर लग्न केलं होतं... त्याबद्दल समाजानं त्याला बहिष्कृत केलं होतं... वाळित टाकलं होतं... त्यामुळे जातीच्या दबावाखाली आणि रागाच्या भरात त्यानं हे कृत्य केलं असावं’ अशी माहिती हिंगमिरे यांनी दिलीय.
‘ज्या परिस्थितीतून कुंभारकर गेला... त्याच परिस्थितीत मी ही आहे... माझ्याही मुलीनं जातीबाहेर लग्न केलंय... म्हणून समाजानं आम्हालाही बाहेर टाकलंय आणि प्रत्यक्षात नसेल तरी अप्रत्यक्षपणे आम्हाला मुलीवरून, जातीवरून टोमणे मारले जातात... आमच्या समाजात बोललं जातं की, याला समाजाची चाड नाही, त्यानं समाजाचा गुन्हा केलाय... आमच्या मुलींनी असं कृत्यं केलं असतं तर आम्ही त्यांना मारून टाकलं असतं असंही समाजाकडून ऐकून घ्यावं लागतं’ अशी धक्कादायक सामाजिक परिस्थिती हिंगमिरे यांनी ‘झी २४ तास’समोर व्यक्त केलीय.
‘आत्तापर्यंत पाच-सहा कुटुंबांना याच कारणामुळे समाजाच्या बाहेर टाकण्यात आलंय.... जातीच्या बाहेर काढल्यानं घरातल्या कार्यक्रमांतही सहभागी करून घेत नाहीत... एखाद्या नातेवाईकानं जातपंचायतीच्या निर्णयाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकडून दंड वसूल केला जातो’ असं सांगत एखाद्याच्या अस्तित्वालाच धुडकावून लावणारी जात-पंचायत आणि त्यांच्या दबावामुळे निर्माण झालेली पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील परिस्थिती हिंगमिरे यांनी व्यक्त केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.