www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आज राज्यभरात होणा-या रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धडरपकड सुरु केलीय. तर मुंबई-कोल्हापूर बायपासवर चांदणी चौकात रास्तारोको केलाय. निफाड हायवेवर आंदोलन सुरू आहे. दरम्यान, नाशिक टोल नाक्यावर पोलिसांची नाकाबंदी करण्यात आलेय.
नागपूरमध्ये मनसेचे पूर्व विदर्भ संघटक हेमंत गडकरी, प्रवीण बरडे यांच्यासह ३ पदाधिका-यांना अटक करण्यात आलीय. तर वर्धा जिल्ह्यातल्या देवळी तालुक्यात मनसे तालुकाध्यक्षांसह ११ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय. तर मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये केंद्रातलं शीघ्र कृती दल तैनात झालंय. आक्रमक होणा-या मनसेच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी राज्य सरकारनं शीघ्र कृती दलाला पाचारण केलंय
मनसेचं राज्यभर टोलविरोधातलं आंदोलन सुरू झालंय...मात्र या आंदोलनाचा वाहतुकीवर अजून परिणाम झालेला नाही...मध्य, पश्चिम तसंच हार्बर रेल्वेवर वाहतूक सुरळीत सुरूय... तसंच बेस्ट, टॅक्सी तसंच रिक्षा वाहतूक सुरळीत आहे. तसंच शाळा आणि कॉलेजसही सुरू आहेत... तसंच १२ वीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रास्ता रोकोचा पहिला दणका मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ला बसलाय. लोणावळा जवळ खंडाळा-बोर घाटात आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या गाड्यांची हवा सोडली. मुंबईहून पुण्याला जाणा-या लेनवर हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे वाहतूक तासभर ठप्प झाली होती.
दरम्यान, राष्ट्रवादीने राज ठाकरे यांना इशारा दिलाय. मी काहीही करेन, कायदा हातात घेईन असं म्हणणा-याला सरकारनं वठणीवर आणलं पाहिजे अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंवर तोफ डागलीये. सरकारनं अशा लोकांना अद्दल घडवून कायदा काय असतो ते दाखवून दिलं पाहिजे, असं जाधव म्हणाले. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही राज कायदा तोडत असतील, तर त्यांना अटक करावी असं म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.