www.24taas.com, नाशिक
एखाद्या प्रश्नावर एखादा उपाय शोधायचा... तो उपाय यशस्वी होऊ लागला की मध्येच खोडा घालायचा आणि घोळ निर्माण करायचा... असाच काहीसा कारभार सुरू आहे नाशिक महापालिकेचा... गेले कित्येक महिने प्रदूषणात अडकलेली गोदावरी आता कुठे मोकळा श्वास घेतेय आणि हे शक्य झालं महापालिकेच्याच पाण्यावरची घंटागाडी या प्रकल्पातून... त्याचं यश दिसत असतानाच महापालिकेनं नवा घाट घातलाय रोबोटिक मशीन्स खरेदीचा...
सध्या तुमचा डोळ्यांवर विश्वास बसणार नाही इतकं स्वच्छ पात्र गेल्या अनेक वर्षांपासून पानवेलीच्या विळख्यात अडकलेल्या गोदामाईचं दिसतंय. फक्त २० दिवसांत गोदामाईचं रुपडं बदललंय आणि आता गोदामाई मोकळा श्वास घेतेय. हे सगळं शक्य झालंय पाण्यावरच्या घंटागाडीच्या अभिनव उपक्रमातून. आता हे काम वर्षाकाठी दीड ते दोन लाखांत होणं शक्य आहे, पण याच कामासाठी आता सतरा कोटी रूपयांचं रोबोटिक मशीन खरेदी करण्याचा घाट घातला जातोय. त्यामुळे पाणी कुठे मुरतंय, असा सवाल राष्ट्रवादी नगरसेवक विक्रांत मते यांनी उपस्थित केलाय.
प्रायोगिक तत्वावर पाण्यावरच्या घंटागाडीचा प्रकल्प राबविला जातोय. त्याचं यश दिसत असतानाही आयुक्तांनी रोबोटिक मशीन खरेदी करण्यासाठी हिरवा कंदील दाखविला. त्यानंतर महापौर यतीन वाघ आणि स्थायी समिती सभापातीही हे मशीन कसं उपयोगी आहे, हे पटवण्याचा प्रयत्न करतायत.
या रोबोटिक मशीनच्या खरेदीतून काय साध्य होणार, हा प्रश्नच आहे. गोदावरीत प्रदूषण वाढायला मुख्य कारण ठरलं ते गोदावरीत सोडण्यात येणारं ड्रेनेजचं पाणी... जोपर्यंत महापालिका त्यासाठी पावलं उचलत नाही, तोपर्यंत अशी कितीही मशीन्स घेतली तरी मुळापासून पानवेली नष्ट होण्याची शक्यता कमीच आहे.