www.24taas.com, पालघर
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आज पालघर दौऱ्यावर येत आहेत. आरोग्यविषयक सुविधांच्या एका नव्या योजनेचा शुभारंभ आज पालघरमध्ये होणार आहे. अडीच तासांत हा दौरा आटपून सोनिया पुन्हा दिल्लीसाठी रवाना होणार आहे.
यावेळी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत देशातील अंगणवाडी, बालवाडी तसंच प्राथमिक शाळेतील आरोग्य तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी मेडिकल सुविधा पुरवण्यात येणार आहेत. देशात अशा स्वरूपाचे चार प्रकल्प वेगवेगळ्या भागांमध्ये राबवण्यात येतील. त्यापैकी पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी करणार आहेत. या प्रकल्पाच्या सुविधांची माहिती ग्रामीण भागातील आदिवासी, दलित तसंच अन्य घटकांतील विद्यार्थ्यांच्या पालकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीनं एका महाआरोग्य शिबिराचंही आयोजन करण्यात आलंय. या शिबिरात ठाणे जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतची ५६ हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
मात्र, यावर आदिवासी पाड्यांमध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. शिवाय राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना सरकारी योजनेचा शुभारंभ करण्यासाठी होणाऱ्या दौऱ्याऐवजी सोनियांनी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा का आयोजित केला नाही? असा सवाल या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय.