www.24taas.com, नाशिक
नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता येवून वर्ष होत आलंय. मात्र ह्या वर्षभराच्या कालावधीत मनसेनं घोषणा व्यतिरिक्त कुठलीच काम केली नाहीत असा विरोधकांचा आरोप आहे. वर्षपूर्ती झाली स्वप्नपूर्ती कधी होणार असा सवाल उपस्थित होत आहे. तर या आधीच्या सत्ताधा-यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती खराब केली होती, ते निस्तारातानाच वर्षभराचा कालावधी लोटल्याचा दावा मनसे करतंय.
मागील वर्षी १७ फेब्रुवारी २०१२ रोजी नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल लागला आणि मनसेच्या इंजिनानं शिवसेनेच्या गडाला भगदाड पाडत तब्बल चाळीस नगरसेवक निवडून आणले. त्यानंतर साधारण महिनाभराच्या कालावधीत मनसेचा महापौर आरूढ होत शिवसेनेच्या ताब्यातील सत्ता काबीज केली आणि राजसाहेबांचं एक स्वप्न पूर्ण झालं. मात्र वर्षभराच्या कालावधीत सत्ताधा-यांकडून फारशी काही काम झाली नसल्याचा आरोप विरोधकांचा आहे. मनसे आणि भाजपची सत्ता असल्यानं त्या दोघांमध्येच ताळमेळ नसल्याचा फटका नाशिकच्या विकास कामांना बसत असल्याचा आरोप करण्यात येतोय.
मनसेनं मात्र या सर्व आरोपांचं खंडन केलंय. जकात खाजगीकरण रद्द करून ठेकेदारापेक्षा दीड पटीने जास्त जकातीची वसुली करून महापालिकेचा गाडा रुळावर आणला. मात्र विरोधक एकजूट करून मनसेला काम करण्यात अडचणी निर्माण करत असल्याचा मनसेचा दावा आहे.
नाशिक शहराला रोल मॉडेल बनविण्याचं स्वप्न मनसेनं नाशिककरांना दाखवलं होतं. मात्र गेल्या वर्षभरात विकासाची ब्लू प्रिंट पुढे सरकलीच नाही. आता महापौरांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरा सुरु केल्यानं त्यावरही राजकारण सुरु झालंय. त्यामुळे आगामी चार वर्षात मनसेच्या विकासाचं इंजिन धावणार की आश्वासनांचा केवळ धूर उडणार याकडं नाशिककरांच लक्ष लागलंय.