www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून देण्याचा पराक्रम करणारे मराठमोळे कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तरही ‘पद्म’ पुरस्कार द्यावासा शासनाला वाटत नाही. हा नागरी सन्मान देण्याचा विचारही सरकारच्या मनात येऊ नये यामुळं जाधवांचं पुत्र रंजीत जाधव निराश झाले आहेत. माझ्या पदकवीर वडिलांच्या कामगिरीचा सरकारला विसर पडल्यामुळं त्यांनी जिंकलेलं ऑलिम्पिक पदक अरबी समुद्रात फेकून द्यावं का?, अशा शब्दांत रंजीत जाधव यांनी सरकारप्रती आपला राग व्यक्त केला.
खाशाबा जाधव यांनी १९५२मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताला कुस्तीतील पहिलं कांस्यपदक जिंकून दिलं होतं. ऑलिम्पिक पदक विजेत्या सर्व खेळाडूंचा ‘पद्म’ पुरस्कारानं सन्मान झालेला असताना केवळ खाशाबा जाधवच या पुरस्कारापासून वंचित आहेत.
शासनानं १९९६नंतर ऑलिम्पिकमधील सर्व वैयक्तिक पदकविजेत्यांना ‘पद्म’ पुरस्कारानं गौरविलं. मात्र, खाशाबा जाधव यांचं १९८४मध्ये अपघाती निधन झाल्यानं ते या पुरस्कारापासून वंचित राहिले. ‘पद्म’ पुरस्काराच्या नियमानुसार मरणोत्तर हा पुरस्कार दिला जात नाही. मात्र, शासनानं खाशाबा जाधवांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन नियमात बदल करावा आणि त्यांचा मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्कारानं सन्मान करावा, अशी रंजीत जाधव यांची मागणी केली.
खेळाडूंना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा यासाठी नियमात बदल करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर ‘पद्म’ पुरस्काराच्या नियमातही बदल करायला हवा. नाहीतर वडिलांनी १९५२मध्ये मिळविलेलं ऑलिम्पिक कांस्यपदक आम्हाला फेकून द्यावं लागेल, असा इशाराही रंजीत जाधव यांनी दिला आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.