www.24taas.com, पुणे
कुस्तीमधला WWF हा प्रकार जगभर लोकप्रिय आहे. मात्र, WWF या कुस्ती प्रकारात भारतीय मल्ल अभावानेच आहेत. WWF मधील एकमेव भारतीय नाव म्हणजे खली... आता खलीनंतर WWFमध्ये कदाचित एका मराठी मल्लाचे नाव झळकू शकेल. त्यासाठी संदीप तिकोने या मराठी मल्लाची तयारीही जोरात सुरु आहे. मात्र त्याची आर्थिक परिस्थिती त्याच्या मार्गातील अडथळा ठरली नाही तर.
खेळणा-याच्या जीवावर बेतेल कि काय असं वाटणारा WWF हा कुस्ती प्रकार. धोकादायक वाटत असला तरी हा प्रकार जगभरात तेव्हढाच लोकप्रियदेखील आहे. या लोकप्रिय कुस्ती प्रकारात यापुढे हा मराठमोळा मल्लदेखील पाहायला मिळणाराय. WWF या कुस्तीच्या धोकादायक खेळात संदीप तिकोने मोठ्या धाडसानं उतरलाय. त्याच्या धाडसाला आणि त्याचबरोबर मेहनतीला काही प्रमाणात यशही मिळालंय. WWF साठी संदीप साऊथ आफ्रिकेची वारी करून आलाय. तसंच, कलर्स वाहिनीवरील `रिंग का किंग` या शोमध्येही तो झळकलाय. एवढंच नाही, तर संदीपनं WWFमधील जगप्रसिद्ध आणि एकमेव भारतीय मल्ल `खली`च्या भावालादेखील ट्रेनिंग दिलंय.
संदीपचा इथवरचा प्रवास सोपा नव्हता आणि इथून पुढचा प्रवास तर अधिक खडतर आहे. कारण, WWF कुस्तीचं प्रशिक्षण, खुराक याचा खर्च मोठा आहे. हॉटेलमध्ये काम करून संदीपनं हा खर्च केलाय. मात्र WWFमध्ये पुढील करिअर करायचे असेल तर संदीपला अमेरिकेला जावं लागणाराय. अमेरिकेतल्या संस्थेनंही त्याला निमंत्रण दिलंय. पण आर्थिक परिस्थिती त्याच्यासमोर डोंगरासारखी उभी राहिलीय.
अमेरिकेला जाण्यासाठी आणि तेथील प्रशिक्षणासाठी संदीपला चाळीस लाखांची गरज आहे. तो अमेरिकेला जाऊ शकला नाही तर त्याचे फक्त स्वप्नच भंगणार नाहीतर त्याच्या करिअरलाही पूर्णविराम मिळू शकतो. तसंच WWF मध्ये दुसरा भारतीय मल्ल बनण्याची संधीही हिरावली जाणाराय. संदीपनं WWF मध्ये करिअर करण्याचा निर्णय मोठ्या धाडसानं घेतला होता. मात्र आता हा निर्णय चुकलाय की काय असा विचार त्याला सतावतोय. त्यामुळं संदीप कदाचित अमेरिकेऐवजी पुन्हा एकदा एखाद्या हॉटेल मध्ये दिसू शकेल. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्याला हात हवाय मराठीजनांच्या मदतीचा...