पुण्यात आरपीआय अस्वस्थ...

पुण्यात महायुतीचं जागावाटप रखडल्यानं आरपीआयमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्यास रामदास आठवलेंकडं जाण्याची भूमिका आरपीआयच्या स्थानिक नेत्यांनी घेतली .

Updated: Jan 17, 2012, 11:28 PM IST

झी २४ ताससाठी पुण्याहून अरुण मेहेत्रे

 

पुण्यात महायुतीचं जागावाटप रखडल्यानं आरपीआयमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्यास रामदास आठवलेंकडं जाण्याची भूमिका आरपीआयच्या स्थानिक नेत्यांनी घेतली .

 

पुण्यात महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ अनेक दिवसांपासून सुरू आहे. त्यासाठी भाजप शिवसेनेच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत. महापालिकेच्या १५२ जागांपैकी १२८ जागांवर दोन्ही पक्षात एकमत झालं आहे. इतर २४ जागांचा तिढा मात्र सुटलेला नाही. दुसरीगोष्ट म्हणजे पुण्यातला जागांचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळं कुणाकडे किती जागा येणार हेही निश्चित नाही. आरपीआयला तर या बैठकांमध्ये सामीलही करुन घेण्यात आलेलं नाही. भाजप आणि शिवसेना आपापल्या जागा आधी वाटून घेणार आणि त्यानंतर त्यांच्या कोट्यातून आरपीआयला जागा देणार आहेत. आत्तापर्यंत भाजप शिवसेनेनं आरपीआयला १२ जागा देऊ केल्यात. त्यात भाजप ७ तर शिवसेना ५ जागा देणार आहे.

 

पुण्यात आरपीआयला मात्र ३३ जागा हव्या आहेत. भाजप शिवसेनेचा आत्तापर्यंतचा प्रतिसाद पाहता आरपीआयमध्ये अस्वस्थता आहे. अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत तर रामदास आठवलेंकडं दाद मागण्याची भूमिका स्थानिक आरपीआय नेत्यांनी घेतली आहे. महायुतीतचे पुण्यातले नेते जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं सांगत आहेत. मात्र तिन्ही पक्षांनी घेतलेल्या भूमिकेवरुन अंतिम टप्पा किती मोठा असेल हे सांगता येत नाही. सध्यातरी महायुतीच्या जागावाटपाची महाप्रतिक्षा सुरू आहे असच म्हणावं लागेल.