मनसेचा महापौर नको, राज यांची नाकाबंदी?

नाशिक महापालिकेत सर्वाधिक जागा मिळालेल्या मनसेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी मुंबईत जोरदार लॉबिंग सुरु आहे. सत्तास्थापनेच्या मनसेच्या आकांक्षाना तडा देण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. त्यातून महापालिकेच्या ठेक्याशी संबंधित असलेले काही उद्योजक तसंच जकातीमध्ये रस असलेल्यांनी हे प्रयत्न जोरदार चालवले आहेत.

Updated: Feb 19, 2012, 03:23 PM IST

www.24taas.com, नाशिक

 

नाशिक महापालिकेत सर्वाधिक जागा मिळालेल्या मनसेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी मुंबईत जोरदार लॉबिंग सुरु आहे. सत्तास्थापनेच्या मनसेच्या आकांक्षाना तडा देण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. त्यातून महापालिकेच्या ठेक्याशी संबंधित असलेले काही उद्योजक तसंच जकातीमध्ये रस असलेल्यांनी हे प्रयत्न जोरदार चालवले आहेत. त्यातून कदाचित परस्पर विचारधारेचे पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

पुण्यानंतर राज ठाकरे आज नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. नाशिक महानगरपालिकेतला सर्वात मोठा पक्ष मनसे सध्या राज्यातील पहिला मनसेचा महापौर देण्याच्या तयारीत गुंतला आहे. सत्तास्थापनेसाठी ६२ हा आकडा गाठावा लागणार आहे. मनसेचे ४०, भाजपचे १४ नगरसेवक आणि काही अपक्षांच्या मदतीने महापौरपद खेचून आणण्यासाठी मनसे प्रयत्नशिल आहे. मनसेशी युती करायला हरकत नाही, असे संकेत भाजपच्या नेत्यांकडून मिळत आहेत.

 

त्यासाठीच राज ठाकरे आज विजयी नगरसेवकांशी संवाद साधून रणनीती आखतील, अशी चर्चा आहे. दुसरीकडे मनसेला सत्तेपासनं दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीची मदत घेऊन पुणे पॅटर्न राबवता येऊ शकतो का याचीही चाचपणी शिवसेनेच्या गोटात सुरु आहे. स्थानिक पातळीवरच निर्णय घेतला जाईल, असे सर्वच पक्ष सांगत असले तरी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.