www.24taas.com, नाशिक
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज नाशिकमध्ये रोड शो होता. नाशिकमध्ये १२२ जागांवर या पक्षाचे उमेदवार उभे असल्याने राज ठाकरे यांनी नाशिक मध्ये रोड शो केला. चांडक सर्कलपासून या रोड शोला सुरुवात झाली आहे. दोन सत्रांमध्ये या रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं.
पण नाशिकमध्ये मनसे उमेदवाराच्या रोड शो दरम्यान शिवसैनिक समोर आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मनसे उमेदवाराच्या प्रचारासाठी निघालेला रोड शो मेनरोड मार्गे गाडगेमहाराज पुतळ्याजवळ आला असताना हा प्रकार घडला. या रोड शो दरम्यान शिवसेना उमेदवार विनायक पांडे शिवसैनिकांसह मनसैनिकांसमोर आले. यावेळी मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये तुंबळ घोषणायुद्ध रंगलं. या घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
मनसेचा रोड शो पुढे गेल्यानंतरही शिवसैनिकांची घोषणाबाजी सुरुच होती. त्यामुळे रोड शो मनसेचा आणि शिवसेनेची घोषणाबाजी असं चित्र काही काळ निर्माण झालं होतं. मात्र मनसेचा रोड शो पुढं मार्गस्थ झाल्यानंतर तणाव निवळला. त्यामुळे राज ठाकरेंच्या रोड शोला नाशिकमध्ये कसा चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यातच नाशिकच्या मनसे उमेदवाराचं कार्यालय जाळण्याची घटना कालच घडली. त्याबद्दल राज ठाकरे काय बोलणार याकडेही लक्ष लागलं आहे. नाशिकमध्ये अजून एकाही बड्या नेत्यानं प्रचाराला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी प्रचारात आघाडी घेतली आहे.