www.24taas.com, झी मीडिया, सांगली/बारामती/कोल्हापूर/पुणे
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी एक पाऊल पाठिमागं घेत २६५० रुपये उसाला पहिली उचल घ्यायला मान्यता दिली असली तरी कोल्हापुरात सकाळपासून ठिकठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं.
कागल तालुक्यातील सिद्धनेर्ली इथं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झालेत. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सिद्धनेर्ली इथल्या नदीकाठ परिसरात रस्त्यांवर दगड, काचा आणि झाडं टाकून रास्ता रोको केला. यावेळी वाहनाचे टायर्स पेटवून वाहतूक ठप्प केली. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पोलिसांनी नाहक मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दर आंदोलनाला कराड वकील संघटनेनं पाठिंबा दिलाय. संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सर्व केसेस कराड बार असोसिएशन मोफत लढणार आहे. तसंच स्वाभिमानी संघटनेला बार असोसिएशननं २५ हजारांची मदतही जाहीर केलीय. ऊस दर आंदोलनात कराड पोलिसांनी १२२ जणांना अटक केली आहे.
बारामतीमध्ये आज ऊस दराच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या शेतकऱ्यांनी बारामतीमध्ये मोर्चा काढला होता. पोलिसांनी हा मोर्चा शहरातल्या इंदापूर चौकात अडवून कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केलं.
मात्र आंदोलनामुळं सांगली, मिरज, कोल्हापूर परिसरातली एसटी सेवा पूर्णपणे ठप्प आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध ठिकांणासाठी पुण्यातून रोज सुमारे चारशे गाड्या सुटतात. आंदोलनामुळं मात्र दुसऱ्या दिवशी एकही गाडी एसटी महामंडळानं सोडलेली नाही. तसंच या परिसरातूनही एसटीच्या बस पुण्यात आलेल्या नाहीत. पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावर त्यामुळं शुकशुकाट अनुभवायला मिळतोय. साताऱ्यापर्यंत धावणाऱ्या बसेसनाही सुरक्षेचा उपाय म्हणून लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत.
ऊसाला वाढीव भाव मिळावा या मागणीसाठी राज्यात शेतकरी संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला आता ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनीही पाठींबा दिला आहे. सरकारच्या भरवश्यावर राहिले तर हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी आंदोलन करावच लागेल, तरच हा प्रश्न सुटणार असल्याचं मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलं आहे. एवढचं नाही तर आंदोलनात हिंसा करू नये, अहिंसेच्या मार्गानं आंदोलन करावं, असं अण्णा म्हणालेत.
दरम्यान, ऊस दराच्या आंदोलनाबाबत राजू शेट्टी यांनी घेतलेल्या सामंजस्याच्या भूमिकेचं सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वागत केलंय. ६ डिसेंबरला दिल्लीत होणाऱ्या बैठकीत तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.