www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर
पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रानं शरमेनं मान खाली घालावी अशी घटना अहमदनगर जिल्हातील खर्डा गावात घडलीयं. नितीन आगे नावाच्या एका मुलाचा अख्ख्या गावाच्या साक्षीनं अमानुषपणे मारझोड करत, क्रुरपणे खून करण्यात आला. वेदनेनं तडफडत मेलेल्या नितीन आगेनं वरच्या जातीतल्या मुलीशी प्रेम करण्याचा गुन्हा केला होता. आपला जीव गमावून नितीननं आपल्या प्रेमाची किंमत चुकवली.
खर्डा इथं घडलेल्या या क्रूर हत्याकांडानंतर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांनी आज खर्डा गावात येत आगे कुटुंबीयांचं सांत्वन केलं. झालेल्या प्रकाराबाबत आठवले यांनी संताप व्यक्त केला. तसंच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी केली. हे प्रकरण विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याकडे हे प्रकरण सोपवावं अशी मागणी आठवले यांनी केलीय.
का आणि कसा गेला कोवळ्या नितीनचा जीव…
जातीपातीच्या भिंतींखाली चिरडून नितीन आगेचा मृत्यू झालाय. नितीन आगे हा नगर जिल्हातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावातल्या शाळेत बारावीत शिकत होता. त्याच्यात शाळेतील एका मुलीवर त्याचं प्रेम होतं. खालच्या जातीतील मुलाशी असलेलं हे प्रेम मान्य नसल्यानं मुलीचा भाऊ सचिन गोलेकर यानं आपल्या साथीदारांसह हाल हाल करुन नितीनला मारलं. नितीनला मारझोड करण्यात आली, गरम सळ्यांनी भोसकण्यात आलं, वीट भट्टीवर नेऊन लाकडी काठीने बेदम मारहाण करण्यात आली, अखेर कौर्याची परिसिमा गाठत जवळच्या कान्होबाच्या डोंगरावर नेऊन फाशी देण्यात आलं. ही गोष्ट नितीनच्या आईवडिलांना कळली तेव्हा त्यांनी हंबरडाच फोडला.
भेदरलेल्या नितीनच्या मातापित्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. नितीनचा ज्या अमानुषपणे खून करण्यात आला ती कहाणी पोलिसांना त्यांनी ऐकवली. पोलिसांनी या खुनाप्रकरणी सचिन गोलेकर, शेषराव येवले, आकाश सुर्वे यांच्यासह 10 आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी दिलीय.
पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असली तरी नितीनला न्याय मिळणार का? हा सवाल कायम आहे. नितीन शाळेतच त्या मुलीसोबत बोलत होता. त्यावेळी मुलीच्या भावानं त्याला पाहिले आणि नातेवाईकांच्या मदतीनं नितीनला शाळेतूनच ओढून नेले आणि त्याचा खून करण्यात आला असा नितीनच्या पालकांचा आरोप आहे. पण शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब ढोबे मात्र अशी घटना शाळेत घडलीच नाही असे सांगत आहेत.
फुले-आंबेडकर-शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात वरिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीतील मुलीशी प्रेम केल्याची मोठी किंमत नितीनला मोजावी लागलीय. पोलिसांनी आरोपी गजाआड केले असले तरी मानवतेला काळिमा फासणारी ही मानसिकता कशी दूर करणार... जातीपातीचे भेद कधी मिटणार? नितीनच्या माता पित्यांचे अश्रू पुसायला राजकारण्यांना आणि सत्ताधाऱ्यांना वेळ आहे कुठे? सत्तेची समिकरणं जुळवण्यात निबर कातडीचे राजकारणी मग्न आहेत. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात जातीयतेचा बळी ठरलेल्या नितीनला न्याय मिळणार आहे का हाच खरा सवाल आहे.
व्हिडिओ पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.