www.24taas.com, पुणे
अजित पवारांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. 2003 ते 2011 या काळात जलसंपदा आणि अर्थखात्याचे मंत्री असताना त्यांनी तब्बल 2 हजार दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनाकडून उद्योगांसाठी वळवल्याचं उघड झालं आहे. `प्रयास` या पुण्यातल्या स्वयंसेवी संस्थेनं हा गौप्यस्फोट केलाय. अजित पवारांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळले आहेत.
‘पाणी नाही तर मिळणार कुठून?’ हा अजित पवारांचा दावा योग्य होता. पण धरणांमधलं हे पाणी संपवलं कुणी? ज्यांच्यावर जनतेला पाणी देण्याची जबाबदारी होती त्या अजित पवारांनीच धरणांतलं पाणी संपवलं आहे. जलसंपदा आणि अर्थखात्याचे मंत्री असताना त्यांनी तब्बल 2 हजार दशलक्ष घनमीटर पाणी सिंचनाकडून उद्योगांसाठी वळवल्याचं उघड झालंय. उच्चपदस्थ समितीचे प्रमुख या नात्यानं त्यांनी ही करामत केली.
`प्रयास` या पुण्यातल्या स्वयंसेवी संस्थेनं हा गौप्यस्फोट केला आहे. खळबळजनक बाब म्हणजे सरकारच्या धोरणांना बगल देत हे बदल करण्यात आले आहेत. राज्यांतल्या 51 धरणांतून 2 हजार दशलक्ष घनमीटर पाणी उद्योगांसाठी पळवण्यात आलं. कोयना धरणाच्या क्षमतेइतकं पाणी उद्योगांसाठी वळवलं. त्यामुळे 4 लाख हेक्टरवरच्या सिंचनाला फटका बसला. 2003 ते 2011 या काळात उद्योगांसाठी हे पाणी देण्यात आलं. 23 सिंचन प्रकल्पांसाठीचं 40 ते 80 टक्के पाणी उद्योगांना मिळालं. पाणी वाटपाचा अधिकार ज्या उच्चस्तरीय समितीला होता त्या अजित पवारांच्या समितीनं हे सगळे निर्णय घेतले. अजित पवारांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. काहीही नियमबाह्य केलं नसल्याचं त्यांचं म्हणणंय.
धरणांच्या पाण्यावर उद्योग कसे सुरू आहेत, याची अनेक उदाहरणं आम्ही याआधीही दाखवली आहेत. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी मिळालेलंच नाही अजित पवार काहीही दावा करत असले तरी पाणी कुठेतरी मुरलेलं आहेच, हे पाण्याइतकं स्वच्छ आहे.