www.24taas.com, झी मीडिया, बारामती
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. कारण आयव्हीसीआरएल कंपनीने बारामती-फलटण रस्त्याचे काम बंद ठेवले आहे.
आता चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करणार नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.
``बारामतीत अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकार्यांना `मस्ती` आली आहे. चुकीची कामे करणार्या अधिकार्यांची आता गय केली जाणार नाही. त्यांना गडचिरोलीलाच पाठवतो,`` असा इशारा अजित पवारांनी दिलाय.
बारामती तालुक्यातील शिरष्णे येथील जाधववस्ती येथील बहुउद्देशीय सभागृहाचे उदघाटन पवार यांनी केले. ते काम पाहुन अजित पवारांनी संताप व्यक्त केला, अशी निकृष्ट कामं करायची असतील तर आपल्याला उद्घाटनाला बोलवू नका, असं अजित पवारांनी म्हटलंय.
बारामती-फलटण रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून बंद पडले आहे. त्याचीही दखल पवार यांनी घेतली. ``आयव्हीसीआरएल कंपनी काम करत नसेल, तर कंपनीस काळ्या यादीत टाका,`` असे आदेश त्यांनी प्रांताधिकार्यांनी दिले.
``रस्त्याच्या कामाला विरोध करणार्यांची यांची यादी द्या. त्यांच्याशी मी स्वत: चर्चा करतो. त्यामुळे रस्त्याचे काम मार्गी लागण्यास मदत होईल. ग्रामसेवक आणि तलाठय़ांनी ठरविले, तर ते गावाचा चांगला विकास करु शकतात,`` असंही यावेळी अजित पवारांनी सांगितलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.