एक बिस्कीट पडलं ७३ हजार रुपयांना!

बसमधील सह-प्रवाशाला गुंगीचं औषध देऊन काही चोरट्यांनी ऐवज लंपास केलाय. तब्बल ७३ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या या चोरट्यांच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 4, 2013, 04:12 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कराड
बसमधील सह-प्रवाशाला गुंगीचं औषध देऊन काही चोरट्यांनी ऐवज लंपास केलाय. तब्बल ७३ हजारांचा ऐवज लंपास करणाऱ्या या चोरट्यांच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आलीय.
पांडुरंग घार्गे हे काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. परतीच्या प्रवासात ते दुपारच्या सुमारास स्वारगेट-विटा या बसमध्ये चढले. त्यावेळेस त्यांच्या बाजूला ४० ते ४५ वय असलेला एक गृहस्थ येऊन बसला. बस कात्रज घाटत आली असता त्या इसमाने हिंदी भाषेत घार्गे यांच्याशी संवाद साधत असतानाच आपल्याकडील एक बिस्कीट खाण्यासाठी दिलं. त्यानंतर बर्गे यांना झोप लागली.
याचा फायदा घेत त्या इसमानं घार्गे यांच्याजवळील सोन्याची चैन, अंगठी व एक हजार रुपये रोख असा सुमारे ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केलाय. कराड हद्दीच्या आसपास ही बस आली असता संबधित बसच्या वाहकाला घार्गे बेशुध्द पडले असल्याचे लक्षात आलं. त्यानंतर ड्रायव्हरनं ही बस थेट सिध्दीविनायक हॉस्पिटलमध्ये नेली.

हॉस्पीटलमध्ये घार्गे यांच्यावर उपचार केल्यानंतर काही वेळाने ते शुद्धीवर आले. पण आपल्याकडील सगळा किंमती ऐवज गायब असल्याचं लागलीच त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी कराड पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली. पुणे हद्दीत हा प्रकार घडल्यानं आता पुणे पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.