www.24taas.com, पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवडमधल्या धनश्री रुग्णालयात एका पाच वर्षीय चिमुरड्याला डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा फटका बसलाय. दुखापत झालेल्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यासाठी तो रुग्णालयात दाखल झाला खरा, पण डॉक्टर त्याच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करून मोकळे झाले.
पिंपरी-चिंचवडच्या थरमॅक्स चौकातील धनश्री रुग्णालयात पियुष सुधीर इंगोले याला आर. एन. पटवर्धन या डॉक्टराच्या निष्काळजीपणाचा चांगलाच फटका बसलाय. त्याच्या पायाला दुखापत झाल्यानं तीन दिवसांपासून त्याच्यावर धनश्री रुग्णालयात उपचार सुरू होते. पायात गाठ झाली असून त्यातील जंतूसंसर्ग वाढत असल्यानं शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांनी शनिवारी दुपारी त्याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. परंतु शस्त्रक्रियेनंतर शुद्धीवर आलेल्या पियुषनं दोन्ही पाय दुखत असल्याचे आपल्या नातेवाईकांना सांगितलं. डॉक्टरांनी त्याच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया केल्याचं लक्षात येताच सर्वांनाच धक्का बसला.
डॉ. पटवर्धन यांनी चुकीच्या पायावर शस्त्रक्रिया केल्याचं मान्य केलं असून पियूषला भविष्यात काही अडचण निर्माण झाल्यास ११ लाख रुपये देण्याचं लेखी आश्वासन त्याच्या कुटुंबियांना दिलंय...परंतु याबाबत त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. ज्या विश्वासाने आपण डॉक्टरांकडं जातो आणि आपला अनमोल जीव सोपवतो. त्या विश्वासालाच त़डा देण्याचं काम डॉक्टरच्या या निष्काळजीपणानं केलंय.