www.24taas.com, झी मीडिया, पुणे
वेल्हा तालुक्यातील एका अपंग रिक्षाचालकाला गावगुंडानी जबर मारहाण केली. त्याचे दोन्ही हात गुंडांनी पाईपने ठेचून जायबंदी केलं. एवढं होऊनही आरोपी मोकाटच आहेत. प्रकरण किरकोळ असल्याची नोंद करत स्थानिक पोलिसांनी आरोपींना अजूनही अटक केलेली नाहीये. सध्या हे संपूर्ण गाव दहशतीखाली आहे.
एका पायानं अपंग असलेल्या सुरेश जाधव यांचे दोन्ही हात निकामी झालेत. आणि अशा अवस्थेतही पोलिसांचे उंबरे झिजवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. सुरेश जाधव रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. वेल्हा तालुक्यातील सोंडे माथना गावात त्यांचं घर आहे. आपलं गाव हागणदारीमुक्त व्हावं म्हणून त्यांनी स्वतःच्या घराशेजारी, तेही स्वत:च्या जागेत शौचालयाचं बांधकाम सुरु केलं. मात्र गावातल्या गावगुंडानी त्याला विरोध केला. बांधकाम बंद पाडलं म्हणून त्यांनी वेल्हा पोलिसांकडे तक्रार दिली. या रागातून गावातील पैलवान भरत किन्हाळे, ज्ञानेश्वर किन्हाळे यांच्यासह 8 ते 10 गुंडांनी सुरेश जाधव यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला. त्यांची पत्नी तसंच वृद्ध आई- वडलांनाही मारहाण करण्यात आली. 5 जानेवारी 2013 ला ही घटना घडली. वेल्हा पोलिसांनी याप्रकरणी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवला. त्यानंतर या गुंडांनी सुरेश जाधव यांच्या नातेवाईकांना देखील मारहाण केली. गुंडांचा हैदोस एवढ्यावरच थांबला नाही. 12 एप्रिल 2013 रोजी सुरेश जाधव गावाकडे यात्रेसाठी जात असताना या गुंडांनी त्यांना रस्त्यात गाठलं. त्यांनी त्यांचा पाय उखडण्याचा प्रयत्न केला. सुरेश जाधव स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना हल्लेखोरांनी त्यांचे दोन्ही हात पाईपने ठेचून काढले. नशीब बलवत्तर म्हणून ते आज जिवंत आहेत.
दुसऱ्यांदा झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी सुरेश जाधव यांनी राजगड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला. मात्र पुढे काहीच कारवाई केली नाही. पोलिसांनी या प्रकरणाला किरकोळ भांडण असल्याचं सांगून आरोपींविरोधात कठोर कलमं लावण्याचं टाळले. अशा अवस्थेत भीतीच्या सावटाखाली असलेल्या सुरेश जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अखेर पोलिस अधीक्षकांकडे दाद मागितली आहे.
सुरेश जाधव यांना झालेल्या मारहाणीनंतर संपूर्ण गाव दहशतीखाली आहे. गावात गुंडाराज असल्याची गावकऱ्यांची भावना आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी पिडीताना दिलंय. मात्र ते याविषयी कॅमेरासमोर बोलायला तयार नाहीत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.