www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
काँग्रेसचे नेते आणि देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मनातील इच्छा बोलून दाखविली आहे. ती काँग्रेसला कितपत रुचेल हा भाग वेगळा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे देशाचे पंतप्रधान व्हायला हवेत, असे धक्कादायक विधान शिंदे यांनी केले आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्याची तयारी काँग्रेसमध्ये सुरू आहे. त्याचवेळी शिंदे यांनी असे वक्तव्य करून सर्वांनाच दे धक्का दिलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पंतप्रधान झाले तर आपल्याला आनंद होईल, असं शिंदे यांनी म्हटलंय.
पवार यांचा अनुभव बघता ते पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात. त्यांनी तसे चार वेळा प्रयत्नही केलेत. मात्र, त्यांना यश आलेले नाही. केवळ दिल्लीच्या राजकारणामुळेच पवार पंतप्रधान होऊ शकले नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
शुक्रवारीच शिंदे यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करावं, अशी पक्षात सर्वांचीच मागणी असल्याचं म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर दुसर्या दिवशी शिंदे यांनी आपला कौल पवारांना दिलाय. त्यामुळे नक्की शिंदेचं काय चाललंय, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
सोलापुरात शिंदे यांनी पवारांचं नाव पुढं केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होतं आहे. मात्र शरद पवार यांनी आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीत असं अगोदरच जाहीर केलंय. त्याचवेळी शिंदे यांनी आपल्या विधानावर पुन्हा घुमजाव केले आहे. पवारांची तशी इच्छा असेल. अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. तर त्यात वावगे काहीही नाही. राहुल हेच पंतप्रदान असावेत, असेही त्यांनी म्हटलेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ