www.24taas.com, झी मीडिया, पुणे
आज राष्ट्रीय ग्राहक दिन... त्यानिमित्तानं ग्राहकांची सर्वाधिक फसवणूक कोण करतं, हे आम्ही जाणून घेतलंय. पुण्यात यामध्ये सगळ्यात वरचा क्रमांक पटकावलाय बिल्डर्सनी... ग्राहकांनो, तुमची फसवणूक कोण करतं आणि कुणापासून तुम्हाला जास्त सावध रहायला हवं, हे यातून तुम्हाला लगेच उमजून येईल.
पुण्याच्या ग्राहक न्यायालयातून मिळालेली ही माहितीच पाहा…
* १ जानेवारी २०१३ ते ३० नोव्हेंबर २०१३ या ११ महिन्यात पुण्याच्या ग्राहक न्यायालयात एकूण ५५९ दावे दाखल झाले.
* त्यापैकी, सर्वाधिक ३१५ तक्रारी फक्त बिल्डरांच्या विरोधात आहेत.
* त्यानंतर विमा कंपन्यांच्या विरोधात १०९ आणि बँकांच्या विरोधात ५५ तक्रारी दाखल झाल्या आहेत.
* ग्राहकांच्या फसवणुकीचा आरोप असणा-या विमा कंपन्या आणि बँकांमध्ये बहुतेक खाजगी बँका आणि विमा कंपन्यांचा भरणा आहे.
* या व्यतिरिक्त वीज कंपनी, शैक्षणिक संस्था, पोस्ट यांच्या विरोधातही ग्राहक न्यायालयात दावे दाखल आहेत.
राज्यात ३९ ग्राहक मंच आहेत. मात्र, यातल्या बऱ्याच ठिकाणी मंचाचे अध्यक्ष आणि सदस्यांची पदं रिकामी आहेत. ‘जागो ग्राहक जागो…’ ही जाहिरात करण्यापलीकडे सरकारने ग्राहकांच्या जागृतीसाठी काही केलेलं दिसत नाही. त्यामुळे आता ग्राहकांनाच आपल्या हक्कासाठी पुढे यावं लागणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.