www.24taas.com, सोलापूर
सोलापूर-पुणे-हैद्राबाद या महामार्ग क्रमांक नऊवर 2012 मध्ये 526 लोकांना जीव गमवावा लागलाय, तर 1270 लोकांना अपंगत्व आलंय. या हायवेवर असणारी धोकादायक वळणं, अकुशल ड्रायव्हर आणि खड्ड्यांमुळं अपघातांचं प्रमाण वाढत आहे.
हायवे नंबर नऊ. अर्थात सोलापूर-पुणे-हैद्राबाद रोड. याच रस्त्यावरून आंध्र, कर्नाटक आणि तामिळनाडूकडची वाहतूक होते. रहदारीचा सतत राबता असलेला हा हायवे सध्या मात्र मृत्युचा सापळा बनलाय. 2012 या सरत्या वर्षात हायवे नंबर नऊवर 526 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. तर 1270 जणांना अपंगत्व आलं.
मुंबई पुण्याचे नागरिक तुळजापूर, पंढरपूर, विजापूर किंवा गाणगापूरकडं जाण्यासाठी याच हायवेची वाट धरतात. रात्रीचा भरधाव प्रवास, पहाटे ड्रायव्हरला लागणारी डुलकी, रस्त्यावर असणारी वळणं आणि झाडांच्या सावल्या यामुळं मोठे अपघात होतात.
सोलापूर पुणे हा मार्ग दुपदरी असल्यामुळं वेगळा सर्व्हिस रोड नाही. त्यामुळं दुचाकींची वाहतूकही याच रोडवरून होते. आता हा हायवे चौपदरी होणार असल्यामुळं अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट होण्याची आशा व्यक्त होत आहे.