‘सेव्ह द बेबी गर्ल’ची पुन्हा एकदा गरज...

कोल्हापूर जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण कमी व्हावं, यासाठी जिल्हा प्रशासनानं ‘सेव्ह द बेबी गर्ल’ हा स्तुत्य उपक्रम राबविला होता.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 19, 2013, 10:18 AM IST

www.24taas.com, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण कमी व्हावं, यासाठी जिल्हा प्रशासनानं ‘सेव्ह द बेबी गर्ल’ हा स्तुत्य उपक्रम राबविला होता. ज्याची देशातील इतर अनेक राज्यांनी प्रशंसाही केली होती. पण, सध्याच्या प्रशासनाला बहूतेक याचा विसर पडलाय आणि त्याचमुळे जिल्ह्यात आता स्त्री भ्रूण हत्यांचं प्रमाण वाढू लागल्याचं दिसून येतंय.
१९९१ च्या जनगणनेसुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक हजार पुरुषांमागे ९३१ मुली असं प्रमाण आढळलं होतं. पण गेल्या काही वर्षात मुलींच्या संख्येत घट होत असल्याचं चित्र दिसू लागलंय. जिल्हा प्रशासनाच्यावतीनं तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी ‘सेव्ह द बेबी गर्ल’ हा अनोखा उपक्रम राबवला होता. या उपक्रमामुळं जिल्ह्यातील गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण काही अंशी कमी होऊन दर हजारी पुरुषांमागील मुलींची संख्या वाढली. पण आता स्त्री भ्रूण हत्येसारख्या घटना पुन्हा डोकं वर काढू लागल्यात.
आठवड्याभरापूर्वी भुदरगड तालुक्यातील दारवाडमध्ये डॉ. मत्तीवडेकर यांच्या हॉस्पीटलमध्ये गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्येचा प्रकार उघडकीस आला आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाचे डोळे खाडकन उघडले. या घटनेच्या निमित्तानं जिल्ह्यात स्त्री भ्रूण हत्या करण्याऱ्यांचं रॅकेट असल्याचं उघड झालंय. त्यामुळे जिल्हा प्रशासन यापुढे असे प्रकार रोखण्यासाठी काय प्रयत्न करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोल्हापूर शहरामध्ये १२५ तर ग्रामीण भागात १२१ सोनोग्राफी मशीनची जिल्हा प्रशासनाकडे नोंद आहे. स्त्री भ्रूण हत्येसारखे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाला तात्काळ कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे.