www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातल्या औंध जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर विनायक मोरेंची तडकाफडकी बदली करण्यात आली. आमदार जगताप आणि मोरे यांच्या वादातून ही बदली झाल्याची चर्चा रंगू लागलीय. या बदलीमागचं राजकारण काय ते जाणून घेऊयात....
औंध रुग्णालयाचे अधीक्षक विनायक मोरेंच्या तडकाफडकी बदलीनंतर त्यामागच्या राजकारणाची चर्चा सुरू झालीय. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हद्दीत असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचा प्रश्न जगताप यांनी एवढ्या प्रतिष्ठेचा केला की मोरे यांना घालवल्याशिवाय थांबणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. लक्ष्मण जगताप यांनी रुग्णालयात येत धमकी दिल्याचा आरोप मोरे यांनी केला. त्याची तक्रार थेट आरोग्य मंत्र्यांकडे केली. त्यामुळ नाचक्की झालेल्या आमदारांनी हा मुद्दा येवढा प्रतिष्ठेचा केला की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मोरे यांच्याबद्दल तक्रारींचा पाढा वाचला. अजित पवारांनी चौकशीचे आदेश देताच आयुक्त श्रीकर परदेसींनी चौकशी सुरु केली. पण चौकशी पूर्ण होण्या आधीच मोरे यांची बदली करण्यात आली. मोरे यांची ही बदली एवढ्या तडका फडकी का झाली असेल हे सांगायला अर्थातच कोणा पंडिताची गरज राहिलेली नाही. डॉक्टर विनायक मोरे यांनी या निर्णयाच्या विरोधात ‘मॅट’ अर्थात ‘महाराष्ट्र प्रशासकीय लवादा’कडे दाद मागितलीय.
दुसरीकडे आमदार लक्ष्मण जगताप यांनी बदलीमागे आपला हात असल्याच्या आरोपाचं खंडन केलंय. वास्तविक पाहता आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मतदार संघात इतरही अनेक समस्या आहेत. पण एका रुग्णालयाच्या प्रश्नात त्यांनी एवढा हस्तक्षेप का केला याची चर्चा आता रंगू लागलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.