www.24taas.com, पुणे
पुण्यात सरकारी बालसुधारगुहातल्या अनास्थेची जबर किंमत एका ११ वर्षांच्या मुलाला मोजावी लागलीय. ज्यांच्यावर या मुलाची जबादारी होती त्यांनीच दुर्लक्ष केल्याने या मुलाला गँगरीन झालं. ज्यावेळी त्याला ससूनमध्ये दाखल केलं त्यावेळी या मुलाला टीबी असल्याचंही उघड झालंय.
सध्या, केवळ ११ वर्षांचा असलेला हा मुलगा ससूनमध्ये दाखल आहे... बँडेज गुंडाळलेला त्याचा हात डॉक्टरांनी कापावा लागला आहे. कारण, त्याच्या या हाताला कोल्ड गँगरीन झालं होतं. त्याच्यावर ही वेळ आली ती, महिला व बालकल्याण विभागाच्या या बालसुधार गृहातल्या अनास्थेमुळे... त्याच्या आजाराकडे इथल्या कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. कोल्ड गँगरीन होऊन हात कापण्याची वेळ येईपर्यंत त्या मुलाकडे कुणी लक्षच दिलं नाही.
बालसुधारगृहाच्या दुर्लक्षमुळे या मुलाला फक्त हातच गमवावा लागला नाही तर, वेळेवर उपचार न झाल्यानं या मुलाच्या मेंदूवर परिणाम झाला आहे. आणि त्यामुळं आता त्याला बोलता येण्याची शक्यता कमी आहे. ससूनमध्ये उपचाराला दाखल केल्यानंतर या मुलाला टीबी असल्याचंही उघड झालंय. बालसुधारगृहाच्या अधीक्षिका मात्र जबाबदारी ढकलतायत. दर महिन्याला डॉक्टर मुलांची तपासणी करतात त्यांचाच हा दोष आहे, असा बचाव एम. एन. सोनावणे या बालसुधारगृहाच्या अधिक्षिकांनी केलाय.
या मुलावर सरकारी उपचार होतील. कायद्याप्रमाणे वयाच्या १८व्या वर्षापर्यंत सरकार त्याचा सांभाळ देखील करेल. मात्र, त्यानंतर एक हात नसलेल्या, आजाराच्या आघातामुळे बोलू न शकणाऱ्या या मुलाचे भवितव्य काय? हा खरा प्रश्न आहे.