फेसबुक प्रकरणातून इंजिनिअर तरुणाची हत्या

पुण्यातील एका हिंदुत्ववादी संघटनेशी निगडीत असणाऱ्या काही जणांनी 28 वर्षांच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला लाठ्या – काठ्यांनी इतकी जबर मारहाण केली की त्यामध्ये या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jun 5, 2014, 11:00 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यातील एका हिंदुत्ववादी संघटनेशी निगडीत असणाऱ्या काही जणांनी 28 वर्षांच्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला लाठ्या – काठ्यांनी इतकी जबर मारहाण केली की त्यामध्ये या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.
बुधवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूरमध्ये राहणाऱ्या आणि सध्या हडपसरमध्ये वास्तव्य करणाऱ्या शेख मोहसिन सादिक यांची सोमवारी रात्री हत्या करण्यात आली. यामुळे, या भागात तणाव वाढला होता. कथित, शिवाजी महाराज आणि शिवसेनेचे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर टाकल्याप्रकरणी मोहसिनवर हल्ला करण्यात आला होता. रविवारी रात्री याविरोधात प्रदर्शन करण्यात आले होते.
पोलिसांनी यासंबंधी आयपीसीच्या कलम 302 (हत्या), 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 147 (दंगल) नुसार सात आरोपींवर गुन्हा दाखल केलाय. हिंदू राष्ट्र सेनेशी त्यांचा संबंध असल्याचं सांगण्यात येतंय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाला आरोपींनी बंकर कॉलनीमध्ये लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर जवळच्याच एका हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना त्यानं अखेरचा श्वास घेतला... मोहसिनसोबतच आणखी दोन तरुणांवरही हल्ला करण्यात आला होता. त्या रात्री ते दगडफेकीमध्ये जखमी झाले होते. हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
काही जणांकडून हिंदू-मुस्लिम रहिवाश्यांमध्ये जाणून-बुजून सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय... हिंदू-मुस्लिम बांधवातील संबंध खराब करून दंगली भडकवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची शक्यता स्थानिकांनी व्यक्त केलीय. सोबतच, पोलिसांनी ट्विटर, फेसबुक, व्हॉटस् अप यांवरून पाठवल्या गेलेल्या भावना भडकावणाऱ्या मेसेजेसवर विश्वास ठेऊ नये आणि कुणी असं करत असेल तर तातडीनं पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन केलंय. दरम्यान, या भागात सुरक्षा वाढवण्यात आलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.