www.24taas.com, कोल्हापूर
लाखो भाविकाचं श्रद्धास्थान असणाऱ्या जोतीबाच्या चैत्र यात्रेसाठी चाळीस फुटांपेक्षा अधिक उंचीच्या सासनकाठ्यांना प्रशासनानं मानाई केली होती. पण सासनकाठ्यांच्या उंचीवर प्रशासनाने मर्यादा आणू नये, असा आदेश गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलाय. त्यामुळं ज्योतीबाच्या चैत्र यात्रेतील सानकाठ्यांच्या उंचीची प्रश्न सुटला आहे.
२३ एप्रिल ते २६ एप्रिल दरम्यान दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या ज्योतीबाची चैत्र यात्रा होतेय. या यात्रेमध्ये सासनकाठ्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळं यात्रा काळात संपूर्ण राज्यातून अनेक मानाच्या सासनकाठ्या जोतीबा डोंगरावर दाखल होतात. त्यामध्ये पाच फुटांपासून पन्नासहून अधिक फुटांपर्यंतच्या सासनकाठ्यांचा समावेश असतो. या सानकाठ्यांमुळे अपघात होण्याचीही भीती असते. त्यामुळे यंदाच्या यात्रेसाठी ४० फूटांहून अधिक उंचीच्या सासनकाठ्या नसाव्यात, असा आदेश प्रशासनानं काढला होता. प्रशासनाच्या या आदेशावर गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भक्तांच्या याबाबत असलेल्या तीव्र भावना लक्षात घेऊन, याबाबतचा निर्णय बदलण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलीय.
सासनकाठीच्या उंचीबाबत भक्तांच्या भावनांची अखेर प्रशासनानं दखल घेतलीय. त्यामुळे भक्तांमधून समाधान व्यक्त होतंय.