www.24taas.com, नाशिक
नाशिक मनपा स्थायी समिती सभापतीपदी मनसेचे रमेश घोंगडे विजयी झालेत. घोंगडे १० विरुद्ध ६ मतांनी विजयी झालेत.
शिवसेनेनं मनसेला पाठिंबा दिलाय. या नव्या राजकीय समिकरणांमुंळं शिवसेना-भाजप-मनसे विशाल युतीची नांदी ठरलीय.
स्थायी समिती सभापतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची भूमिका ठरवण्यासाठी मुंबईत गुरूवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. यात सेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मनसेसोबत राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे मनसेचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता.
प्रभाग समिती सभापती निवडणुकीवेळी सेनेने महाआघाडी सोडून महायुतीची वाट धरली. त्याचे परिणाम त्यानिवडणुकीत दिसून आले. हीच परिस्थिती स्थायी समिती सभापती निवडणुकीत दिसून येईल, अशी शक्यता असताना सेनेच्या काही नगरसेवकांनी बंडाळीचा झेंडा उगारत महाआघाडीला जवळ करण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यामुळे सेनेची भूमिका ठरवण्यासाठी नगरसेवकांनी उध्दव ठाकरे यांच्या भेटीचे नियोजन केले होतं. त्यात मनसेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे विजयाची माळ मनसेच्या रमेश घोंगडे यांच्या गळ्यात पडलीय.