तीन शाळकरी मुलींचा `व्हेनम` रॉक बँड

नमिता सबनीस, स्वरा कुलकर्णी आणि अर्शिया बांगेरा या तीन शाळकरी मुलींच्या `व्हेनम` या रॉक बँडची जादू २४ मे पुणेकरांना ऐकता येणार आहे.

Updated: May 20, 2014, 08:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
नमिता सबनीस, स्वरा कुलकर्णी आणि अर्शिया बांगेरा या तीन शाळकरी मुलींच्या `व्हेनम` या रॉक बँडची जादू २४ मे पुणेकरांना ऐकता येणार आहे.
इलेक्ट्रिक गिटारचे आणि की-बोर्डचे सूर छेडत `त्या` झोकात स्टेजवर येणार आहेत आणि त्यांच्या सुरांबरोबर प्रेक्षकही थिरकणार आहेत. विशेष म्हणजे `त्या` तिघी चक्क शाळकरी मुली आहेत.
यातील नमिता आणि स्वरा या दोघी अनुक्रमे १५ आणि १६ वर्षांच्या आहेत. त्या दोघीही इलेक्ट्रिक गिटार वाजवतात. तर अर्शिया १२ वर्षांची असून ती की-बोर्ड वाजवते. त्या हार्मनी इन्स्टिटय़ूट ऑफ म्युझिकमध्ये संगीताचे शिक्षण घेतात.
`व्हेनम`चा प्रेक्षकांसमोरचा पहिलावहिला कार्यक्रम शनिवारी होणार असून साठच्या दशकात गाजलेल्या `द व्हेंचर्स` या रॉक बँडची गाणी हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ असणार आहे.
६ महिन्यांपूर्वी नमिता, स्वरा आणि अर्शिया यांनी `व्हेनम` हा ग्रुप तयार केला. गिटारवादनाविषयी बोलताना स्वरा आणि नमिता म्हणाल्या, ``आम्ही सुरूवातीला `अॅकॉस्टिक` प्रकारची गिटार वाजवण्यापासून सुरूवात केली आणि नंतर `इलेक्ट्रिक` गिटार वाजवू लागलो.
`व्हेंचर्स` या बँडची गाणी आम्हाला आवडायची. त्यांच्या गिटारवादनात वापरल्या गेलेल्या टय़ून्स खूप वेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यांच्या वेगळ्या तंत्रामुळे आम्ही त्यांनाच `आदर्श` मानतो.``
या तिघींचे शिक्षक उपेंद्र लक्ष्मेश्वर म्हणाले, ``हल्ली व्यासपीठावरून गिटारवादन करताना गिटार आणि आवाज वाढवून ऐकवणारा `अॅम्प्लिफायर` यांच्या मध्ये `प्रोसेसर युनिट` हे उपकरण वापरतात. प्रोसेसर वापरल्यामुळे गिटारमधून निघालेला मूळ आवाज ऐकू येताना त्यावर संस्कार होऊनच ऐकू येतो.
पण प्रेक्षकांना गिटारचा मूळ आवाजच ऐकायला मिळावा यासाठी आम्ही प्रोसेसर वापरणे टाळतो. व्हेनमच्या सादरीकरणातही असा प्रोसेसर वापरला जाणार नाही.``

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.