मराठीत बोलला म्हणून, विवाहीत मुलीला शिक्षा!

मुलीचा पिता मराठीतून बोलला म्हणून त्याच्यावर जात पंचायतीनं कारवाई केलीय. मिरजमधल्या बे़डगमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 5, 2013, 04:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मिरज
मुलीचा पिता मराठीतून बोलला म्हणून त्याच्यावर जात पंचायतीनं कारवाई केलीय. मिरजमधल्या बे़डगमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय.
गोसावी समाजातल्या शिवाजी जाधव यांच्या मुलीचं लग्न तीन वर्षांपूर्वी मिरजेतल्या तरुणाशी झालं. सहा महिन्यांनंतर मुलीच्या नणंदेच्या डोहाळ जेवणासाठी मिरजेतून आमंत्रण आलं. यावेळी जाधव यांनी मराठीतून संभाषण केलं. मात्र, तेच पंचांना खटकलं. समाजाच्या पारंपरिक भाषेत न बोलता मराठीत बोलले म्हणून बैठक झाली. त्यासाठी सांगली आणि गोव्यातल्या पंचांना आमंत्रण देण्यात आलं. त्यावेळी मुलगीही घरात मराठीच बोलते म्हणून तक्रार करण्यात आली. त्यावेळी जात पंचायतीच्या पंचांनी जाधव यांना ८० हजारांचा दंड ठोठावला आणि निर्णयावर शिक्कामोर्तब म्हणून तीन रुपये झाडांना बांधूनही ठेवले. तसंच पैसे देईपर्यंत मुलीला नांदवणार नाही, अशी भूमिका घेतली.

अगतिक जाधव बेडगला परतले. पाठोपाठ पंचांनी मुलीलाही आणून सोडले. दोन वर्षांपासून मुलगी माहेरी आहे. जाधव यांनी मुलीला पुन्हा नांदवण्यास न्यावं, यासाठी परोपरीनं जात पंचायतीकडे दाद मागितली. मात्र, त्याचा काहीच फायदा होत नसल्याचं पाहून जाधव यांनी निरज न्यायालयात दावाही दाखल केलाय. मात्र, कोर्टातही केवळ तारखांवर तारखाच मिळत आहेत.
दरम्यान, जाधव यांच्या जावयानं दुसरं लग्नही केलंय. मात्र जाधव न्याय मिळावं यासाठी धडपडत आहेत. विशेष म्हणजे नवी पत्नी यातीलच पंचांच्या भावाची मुलगी आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.