www.24taas.com, कोल्हापूर
चालू गळीत हंगामातील उसाला पहिला हप्ता तीन हजार रुपये देऊन मागील हंगामातील थकीत चुकती केल्याशिवाय ऊस तोडू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. सरकारनं उस दाराबाबत आपली भूमिका १ नोंव्हेबर पर्यंत स्पष्ट करावी अन्यथा इंदापूर आणि करामध्ये आंदोलन करू असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय.
ऊस प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आक्रमक झालेत. यंदा संपूर्ण राज्यात उसाचं उत्पादन कमी आहे. त्यामुळं यंदाच्या हंगामात उसाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आहे. सगळ्याच ऊस उत्पादक शेतक-यांचं लक्ष कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर इथंल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आकराव्या ऊस परीषदेकडं लागलं होतं. अपेक्षेप्रमाणं खासदार राजू शेट्टी यांनी सरकार आणि कारखानदारांवर टिकास्त्र सोडत उसाला भाव द्या नाही तर गाठ आमच्याशी आहे, असं बजावून आंदोलनाचा इशारा दिलाय. तसंच कुणी अंगावर धावून आलं तर आम्ही गप्प बसणार नाही असंही राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितलय.
या ऊस परीषदेमध्ये १२ ठरावही घेण्यात आले. यावेळी स्वाभिमानी संघटनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री, सहकारमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचाही खरपूस समाचार घेतला. ऊस दराबाबत सगळ्याचं शेतकरी संघटनांनी रणशिंग फुकंलय. आता राज्य सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार का हा खरा प्रश्न आहे. जर राज्य सराकारनं वेळीच हस्तक्षेप करुन ऊस दाराचा प्रश्न निकाली काढला नाही तर शेतकरी आणि कारखानदार यांच्यामधील संघर्ष अटळ आहे.