www.24taas.com, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा परिषद हायटेक करण्यासाठी वर्षभरापूर्वी लाखो रुपये खर्चून सर्वच सदस्यांना लॅपटॉप देण्यात आले. मात्र सदस्यांना लॅपटॉप वापरण्याचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे हे लॅपटॉप वापरावीनाच पडून असल्याचं उघडकीस आलंय.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कानाकोप-यातल्या जनतेचे प्रश्न सोडवता यावेत यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषद हायटेक बनवण्यात आली. त्यासाठी वर्षभरापूर्वी सर्वच 69 सदस्यांना महागडे लॅपटॉपही देण्यात आले. या लॅपटॉपच्या सहाय्यानं राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती, जिल्हा परिषदेच्या अनेक योजनांची माहिती सदस्यांना घरबसल्या मिळावी हा त्यामागचा हेतू...मात्र हा हेतूच साध्य झाला नसल्याचं समोर आलंय. विकास कामांचा निधी लॅपटॉपवर खर्च करूनही त्याचा वापरच होत नसल्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
महिला सदस्यांना लॅपटॉपचं मोठं आकर्षण होतं. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे विकास कांमांसाठी तो वापरायचा कसा? असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिलाय. अशा प्रकारेच राज्यातल्या अनेक ठिकाणी निधी योजना अंमलात न आणल्यामुळे वाया जातोय.