राज ठाकरेंच्या उपस्थित उपरकरांचा `मनसे` प्रवेश

शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. उपरकर उद्या मनसेत प्रवेश करणार आहेत. खेडमधील मनसेच्या जाहीर सभेत राज ठाकरेंच्या उपस्थितीत उपरकर प्रवेश करणार आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 14, 2013, 07:39 PM IST

www.24taas.com, रत्नागिरी
शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर यांनी अखेर शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय. उपरकर उद्या मनसेत प्रवेश करणार आहेत. खेडमधील मनसेच्या जाहीर सभेत राज ठाकरेंच्या उपस्थितीत उपरकर प्रवेश करणार आहेत.
२९ डिसेंबरला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उपरकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. मात्र अखेर त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिलीय. काही दिवसांपूर्वीच नाशिकमधील स्थानीक नेते सुनील बागुल यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर आता उपरकरही शिवसेना सोडणार असल्यानं पंक्षातर्गत नाराजीचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आलाय़.
शिवसेनाला मोठा धक्का
शिवसेनेचे नाशिकचे माजी महानगरप्रमुख असलेले सुनील बागुल यांच्या पाठोपाठ सिंधुदुर्गातील शिवसेनेचे मातब्बर नेते उपरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतलाय. हा शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना निश्चितच मोठा धक्का आहे. कारण बाळासाहेबांच्या निधनानंतर पुन्हा एकदा नव्याने उभारण्याचा प्रयत्न करणा-या शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रयत्नांना यामुळे निश्चितच खीळ बसणार आहे.
कोल्हापुरातही शिवसेनेत अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत, त्यामुळे २०१४ च्या निवडणुकाजवळ येत असताना उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्षातील आऊटगोईंग ही चिंतेची बाब बनलीय.

सिंधुदुर्गमध्ये परशुराम उपरकर यांचे समर्थक शैलेश भोगले आणि जयसिंग नाईक या शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांनी आपल्या पदाचे राजीनामे देत विनायक राऊत, अरुण दुधवडकर आणि वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली होती. उपरकरांना विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज आहेत.
परशुराम उपरकर यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. ते सहका-यांसह मनसेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यांच्या मनसे प्रवेशाची तारीख अद्याप निश्चित झालीय. रत्नागिरीतील खेड येथील राज यांच्या जाहीर सभेत ते प्रवेश करणार आहेत. विनायक राऊत, अरूण दुधवडकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक, यांच्या कार्यपद्धतीवर उपरकर नाराज असल्याने ते सेनेला रामराम करीत आहेत.
राज यांच्या ‘उपरे’चे काय?
शिवसेनेला राम-राम ठोकल्यानंतर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ‘मनसे’ राज ठाकरेंच्या बाजुला उभं राहण्याची तयारी दाखवली. मात्र, राज ठाकरेंनी उपरकर यांना ‘उपरे’ असं संबोधत त्यांच्या पक्षात पाऊल ठेवण्याच्या इच्छेला लाल झेंडा दाखवला होता.
राज ठाकरे यांनी त्यांना तिथंच थांबायला लावलं होतं. ‘उद्या कुणीही उठेल आणि मनसेत येतो म्हणेल. मनसे ही काही धर्मशाळा नाही’ असं म्हणत राज ठाकरे यांनी उपरकर यांना ‘उपऱ्या’ची पदवी बहाल केली होती. त्यामुळे उपरकरांना स्थान नाही, अशी चर्चा होती. आता राज कोकण दौऱ्यावर असल्याने त्यांचा प्रवेश निश्चित झालाय.