www.24taas.com, मुंबई
दादरमध्ये मनसैनिकांकडून घडलेला प्रकार घृणास्पद आहे. मनसेत अशा प्रकारांना धारा दिला जाणार नाही, अशा कडक शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकाची खरडपट्टी काढली आहे. अजित पवारांचा निषेध करण्यासाठी मनसैनिकांनी आज दादरमध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनात मनसैनिकांनी एका शालेय मुलाला लघुशंका करण्यास जबरदस्ती केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
या संदर्भात झी २४ तासचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडे प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी म्हणाले, अशा प्रकारे दादरमध्ये मनसैनिकांकडून घडलेला प्रकार घृणास्पद आहे. मनसेत अशा प्रकारांना धारा दिला जाणार नाही,जे पक्षाचे कोणीही असतील तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. ते पक्षातील आहे का हे सर्वप्रथम तपासून पाहिले पाहिजे. तसे घडल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे राज ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांच्या आदेशानंतर महाराष्ट्रात अजित पवार यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन झाले. मुंबईतही अनेक भागात अजित पवार यांच्या विरोधात आंदोलन झाले. दादर मध्ये मनसेचे विभागप्रमुख प्रकाश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या प्रकरणी पाटणकर यांना अटक करण्यात आली. पण यावेळी काही मनसैनिक पांगले आणि त्यावेळी हा घृणास्पद प्रकार घडल्याची माहिती झी २४ तासकडे आहे.