`मतदार यादीतून ८५ टक्के मराठी नावं गायब`

मुंबईच्या मतदारयादीत गोंधळ असल्याचा आरोप, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त ते षण्मुखानंद सभागृहात बोलत होते.

Updated: Mar 9, 2013, 02:05 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईच्या मतदारयादीत गोंधळ असल्याचा आरोप, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त ते षण्मुखानंद सभागृहात बोलत होते.
मनसे हा पक्ष स्थापन होऊन आज तब्बल सात वर्ष पूर्ण झालीत. याच निमित्तानं पक्षाच्यावतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना सावध करताना, राजकारणात काम करताना अजिबात बेसावध राहून चालणार नाही असा उपदेश केलाय. यावेळी मुंबईतील मतदारांची नावं वगळण्यात आलेली एका यादीचं वाचनही राज ठाकरेंनी यावेळी करून दाखवलं.
‘जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांनी मुंबई उपनगरात वगळण्यात आलेल्या मतदारांची नावं जाहीर केलीत. कुणालाही न सांगता मतदार यादीतून मराठी लोकांची नावं वगळण्यात आलीत. जी माणसं वगळली गेलीत त्यांची नावंही माझ्याकडे आहे, त्यातली ८५ टक्के लोक मराठी आहेत. मनसेची लोक निवडून येऊ नये म्हणून या प्रकारचं नवं षडयंत्र उभारण्यात आलंय. अचानक एवढी माणसं मुंबई सोडून कशी गेली??? सगळ्यांना स्थलांतरीत म्हणून दाखवण्यात आलंय’ असं राज ठाकरेंनी यावेळी म्हटलंय.

वगळलेल्या लोकांची नावांची एक यादीच मनसेनं तयार केलीय. आमदार, विभाग अध्यक्ष यांनी सोमवारी मनसेच्या ‘राजगड’ या कार्यालयावरून घेऊन जाण्याची आणि त्यावर काम करण्याची सूचनाही राज ठाकरेंनी केलीय.