www.24taas.com, सोलापूर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील सोलापूर मधील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली. ‘अजित पवार अजूनही काकांच्या जीवावर जगतात, अजित पवार मला फुकटचे सल्ले देऊ नका, काकांच्या जीवावर जगतात, एक वय असतं, आता एवढा मोठा झाला ५० वर्षाचा तरी अजून काकांच्या जीवावर जगतोय अजूनही, त्या काकांनी हात काढला तर पानपट्टीवाला तरी विचारेल का?, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केली.
‘मी सकाळी उशीरा उठतो, सकाळी उठून कामं होतात का? तू काय मला सकाळी चहा द्यायला येतोस का?’ यांचे करोंडोंचो व्यवहार, त्यामुळे यांना झोप कशी येणार, मध्यंतरी यांनी काहीतरी बंड केलं होतं म्हणे, काय झालं?’ काकांनी डोळे वटारताच, काय झालं.. काका मला माफ करा... कुठे गेले तेव्हा आमदार पाठिंबा देणारे? असं म्हणतं राज ठाकरे यांनी अजित पवारांच्या राजीनामा नाट्यावरही टीका केली.
महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळ हा येणार यांची कुणकुण लागलेली होती ना? मग का नाही केलंत नियोजन? असा खडा सवालही राज ठाकरे यांनी विचारला. जलसिंचन खातं तर अजित पवारांकडेच होतं ना.. फक्त घोटाळे करायचे, नियोजन नको... असं म्हणत राज ठाकरे यांनी दुष्काळासाठीही अजित पवारांनाच जबाबदार धरलं. तर दुसरीकडे त्यांनी अजित पवारांची पुन्हा एकदा नक्कल केली, नक्कल ही बेक्कलांची करावी लागते, असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांना चांगलंच धारेवर धरलं. या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केलेली टीका याला आता अजित पवार कसे उत्तर देतात याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.