www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
क्रिकेटमधून नवृत्ती घेतलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मोहम्मद अलीचे बॉक्सिंग ग्लोव्ह्ज आणि सर डॉन ब्रॅडमन यांनी स्वाक्षरी केलेली बॅट हे आपल्यासाठी खास असल्याचं मत व्यक्क केलंय. पण, त्यातही खास आहेत ते प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांनी दिलेले एक रुपयांची ४० नाणी...
भारतातील सर्वात पहिली सेलिब्रिटी कॉमर्स वेबसाइट ;कलेक्टबिलिया वॉल’च्या अनावरणासाठी सचिन हजर झाला होता. कलेक्टबिलिया आणि कॅफे कॉफी डे यांनी संयुक्तपणे दिग्गज सेलिब्रेटीजचे हस्ताक्षर असलेल्या संस्मरणीय वस्तू त्यांच्या चाहत्यांना सादर केल्या. सचिनच्या २०० व्या कसोटीचे प्रतीक म्हणून त्याचे ऑटोग्राफ असलेल्या ५०० बॅटस् कॅफे कॉफी डेच्या देशभरातील वेगवेगळ्या स्टोअर्समध्ये उपलब्ध होणार आहेत. सचिनच्या बॅटसह मुष्टियुद्धाचा बादशाह मोहम्मद अली यांचे ग्लोव्हज्ही या वॉलवर दिसतील.
यावेळी सचिननं सांगितलं, की त्याला अमूल्य गोष्टींचा संग्रह करण्याची आवड आहे. `अली यांचे ग्लोव्ह्ज आणि ब्रॅडमन यांच्या स्वाक्षरीची बॅट हा माझ्या संग्रहालयातील अमूल्य ठेवा आहे. तसंच यामध्ये संगीत क्षेत्रातील दिग्गज मार्क नॉफलर यांनी दिलेली गिटार, मोहम्मद अली यांची स्वाक्षरी असलेले ग्लोव्हज् आणि सर डॉन ब्रॅडमन यांचे हस्ताक्षर असलेली बॅट या सर्व गोष्टी माझ्यासाठीही खास आहेत. पण, त्यातही हृद्याच्या जवळ आहेत ती आचरेकर सरांनी दिलेली ४० नाणी... शिवाजी पार्कवर सरावादरम्यान बाद न होता खेळावं, म्हणून आचरेकर सरांनी ही नाणी मला दिली होती` असं सचिननं यावेळी स्पष्ट केलं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.