संमेलन व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरेंचेच नाव

चिपळुणातील साहित्य संमेलनाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. लेखिका पुष्पा भावेंनी बाळासाहेबांच्या नावाला काल विरोध केला होता. तर शिवसेनेनं कोण या साहित्यिक पुष्पा भावे असा प्रश्न विचारलाय. मात्र, या वादावर पडदा टाकत संमेलन स्वागताध्यक्ष सुनील तटकरे ठाकरे यांचेच नाव असेल असे स्पष्ट केलं.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 7, 2013, 09:12 AM IST

www.24taas.com,चिपळूण
चिपळुणातील साहित्य संमेलनाला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यावरून चांगलाच वाद निर्माण झालाय. लेखिका पुष्पा भावे आणि शिवसेना यांच्यात सामना रंगला. मात्र, या वादावर पडदा टाकत संमेलन स्वागताध्यक्ष सुनील तटकरे ठाकरे यांचेच नाव असेल असे स्पष्ट केलं.
व्यासपीठाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास ज्येष्ठ साहित्यिक पुष्पा भावे यांनी विरोध केला होता. त्यातच चिपळूण येथे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चार दिवसांवर आले असतानाच संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर छापलेला परशुरामाचा परशू आणि परशुराम यांच्या चित्राला विरोध करून संभाजी ब्रिगेडने हे संमेलन उधळण्याच्या धमक्या दिल्या. त्यामुळे वादाचे सावट संमेलनावर होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसांसाठी वंदनीय असून महाराष्ट्रासाठी त्यांचे योगदान आहे. त्यामुळे व्यासपीठाला बाळासाहेबांचेच नाव राहील. यात बदल होणार नाही, असे संमेलन स्वागताध्यक्ष तटकरे यांनी स्पष्ट केलंय. तर वादाशिवाय संमेलन यशस्वी करून दाखवा, असे गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणालेत. संमेलने आणि वादविवाद हे समीकरणच झाले आहे. वादाची गुर्हारळे घालण्यापेक्षा हे संमेलन यशस्वी करून दाखवा, असे ते म्हणालेत.

परशुराम हे कोणत्याही जातीधर्माचे नाहीत. कोकणच्या या निर्मात्याचे परशू हे बोधचिन्ह कदापि हटवणार नाही असे सांगतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि संपादक, साहित्यिक, सुधारक होते. त्यामुळे व्यासपीठाला त्यांचे नाव देऊन बाळासाहेबांना मानवंदना देणारच, असे संमेलन समितीचे कार्यवाह प्रकाश देशपांडे यांनी स्षष्ट केलंय.