www.24taas.com,रत्नागिरी
८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला लागलेलं ग्रहण सुटण्याची काही चिन्ह दिसत नाहीएत. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना शिवसेनेनं विरोध दर्शवला आहे. तर ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी तटकरेंच्या नावाचं समर्थन केलंय.
येत्या जानेवारीत ८६वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलंय. शरद पवार या संमेलनाचे उदघाटक आहेत. तर समारोपाला अजित पवारांना आमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे हे संमेलन राष्ट्रवादीनं हायजॅक केल्याचा आरोप आधीपासूनच होत होता. त्यातच आता सुनील तटकरेंची स्वागताध्यक्ष म्हणून निवड झालीय. तटकरेंवर सिंचन घोटाळ्यांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असल्यानं शिवसेनेनं तटकरेंना विरोध दर्शवलाय.
तटकरेंच्या निवडीचं कोमसापचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी मात्र समर्थन केलंय. संमेलन आणि वाद हे समीकरण नवं नाही. याआधीच्या संमेलनातही राजकारण्यांचा दबदबा राहिला आहे. त्यामुळे आता या संमेलनालाही पुढे कितपत विरोध होतो, याचीच च्रर्चा आहे.