साहित्य संमेलन वाद? `झी २४ तास`चं गाऱ्हाण, व्हय महाराजा...

साहित्य संमेलन आणि वाद असं राज्यात एक समीकरणच तयार झालं आहे. तरुण साहित्यापासून आणि संमेलनापासून दूर होताना दिसतायेत.

Updated: Jan 11, 2013, 04:32 PM IST

www.24taas.com, चिपळुण
साहित्य संमेलन आणि वाद असं राज्यात एक समीकरणच तयार झालं आहे. तरुण साहित्यापासून आणि संमेलनापासून दूर होताना दिसतायेत. संमेलनातून चांगले साहित्यिक गायब होतायेत, संमेलन राजकारण्यांची जत्रा होते आहे आणि साहित्यिकही राजकारण्यांसारखं वागत आहे.
संमेलनाच्या आयोजनात वाद निर्माण होत आहेत. टोकाच्या भूमिका घेत विवेक आणि सौहार्दता हरवल्यासारखी जिंकू किंवा मरु या भूमिकेतून या वादात सगळे उतरत आहेत. साहित्य माणसांना जोडण्याचं काम करतं, इथं माणसंच एकमेकांपासून तुटत आहेत.. अशा परिस्थितीत चिपळुणात साहित्य संमेलन होत आहे. कोकणात कोणतंही कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी गाऱ्हाण घालण्याची प्रथा आहे.. साहित्य संमेलन निर्विघ्न पार पाडावं, यासाठी चिपळूणच्या ग्रामदेवतांना घातलेलं `झी २४ तास`चं हे गाऱ्हाणं
बा देवा म्हाराजा कृष्णेश्वरा, बा देवा म्हाराजा वीरेश्वरा
हे आई ग्रामदेवते भैरी म्हाराजा...
सारस्वतांचे पुर्वसा आणि भूमीच्या राखणदारा...
आज सरस्वतीच्या लेकरांनी चिपळूण नगरीत साहित्याचो जागर करुचो ठरवलो हा म्हाराजा..
या लाल तांबड्या मातीतील लेखकांनी आणि वाचकांनी आपल्या पद्धतीनं जमात तशी शारदामायची सेवा केल्यानी म्हाराजा..
तुझ्या भुमीत यशवंतराव चव्हाण नगरीत 86 व्या साहित्य समेलनाचो मांडव उभारलव म्हाराजा..
या साहित्य संमेलनासाठी , कोकणातलेच न्हय तर महाराष्ट्रातन, आणि सगळ्या भारतभरातन साहित्यीक येतत म्हाराजा..
पण म्हाराजा ह्या संमेलनाक सुरुवातीपासूनच किलेसाचा ग्रहण लागला हा म्हाराजा...
अध्यक्षपदापासून ते नावापर्यत आणि आयुधापासून ते चित्रापर्यंत...
सगळ्याच गोष्टीत यजमानांका उत्तर देताना नाकीनाऊ येतत म्हाराजा..
पन तुझ्या कृपेने इलेल्या सगळ्या संकटाचो सामनो तुझ्या लेकरांनी केल्यानी हा म्हाराजा..
पण आता शुभकार्याचो शुभमुहूर्त जवळ येवन ठेपलो हा म्हाराजा..

तर म्हाराजा,
या संमेलनात मनात कोण वाईट घेवन हय येयत असात, तर तेची बुद्धी परावर्तीत कर म्हाराजा..
हय येनारो प्रत्येक पावनो ह्यो जरी आमचो पावनोच असलो तरी तो यजमान म्हणानच तीन दिवस वागांदे म्हाराजा..
मनी इप्सीलेलो ह्यो साहित्याचो जागर येवस्थीत पार पाडांदे..
वडाची साल पिंपळाक लाव, पिपळांचे साल वडाक लाव...
साहित्य समेंलन निर्विघ्नपणे थाटामाटात पार पाडांदेत म्हाराजा..
आणि गेली 85 वर्ष अभिमानान फडकणारी ही साहित्यपताका यंदाही 86व्या वर्षीही तेवढ्याच डौलान तुझ्या तू हातांन फडकवनं घे रे म्हाराजा...