www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
संजय दत्तच्या आगामी सिनेमातील निर्मात्यांनी संजय दत्तसाठी दाखल केलेली मुदतवाढ याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीये. त्यामुळं संजय दत्तला दिलेल्या मुदतीतच शरणागती पत्करावी लागणार आहे. सुप्रीम कोर्टानं संजय़ला आणखी एक दणका दिलाय.
१९९३ बॉम्बस्फोट खटल्यात पाच वर्षांची शिक्षा झालेल्या संजय दत्तची पुनर्विचार याचिका आज सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. त्यामुळे १६ तारखेला संजय दत्तला तुरुंगाची वारी करावीच लागणार आहे. असं असलं तरी त्याच्यासमोर काही पर्याय अजूनही आहेत...पाहूयात काय पर्याय आहेत.... सुप्रीम कोर्टानं संजय दत्तची पुनर्विचार याचिका फेटाळल्यानंतर आता संजय दत्तसमोर नेमके काय पर्याय शिल्लक आहेत, याविषयी चर्चा सुरू झालीये. कायदेतज्ज्ञांच्या मते संजय दत्तसमोर आता चार पर्याय शिल्लक आहेत. त्यातला...
क्युरिटी पीटीशन अर्थात सुधारित याचिका
ही याचिका सुप्रीम कोर्टाच्या पाच वरिष्ठ न्यायाधीशांसमोर ठेवली जाते. याचिका कोर्टानं मान्य केल्यानंतर संबंधित तपास यंत्रणांना नोटीस काढून याचिकेबाबत विचारणा केली जाते. तपास यंत्रणांना उत्तर देण्यासाठी वेळ दिला जातो. त्यानंतर पाच न्यायाधीशांचं कोर्ट शिक्षेसंदर्भात विचार करून निर्णय देतं.संजय दत्तसमोरच्या दुस-या पर्यायाबाबत जस्टीस मार्कंडेय काटजूंनी आधीच मोर्चेबांधणी सुरू केलीये. तो पर्याय म्हणजे
राज्यपालांकडे शिक्षा माफीसाठी याचिका.
संजय दत्तची शिक्षा माफ करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी राज्यपालांकडे पत्राद्वारे याचिका करण्यात आलीये. त्यावर राज्यपाल आपला निर्णय देतील. याशिवाय राष्ट्रपतींकडे शिक्षा माफीसाठी याचिका करण्याचा पर्याय संजय दत्तसमोर आहे. काटजू यांनी राष्ट्रपतींकडेही पत्राद्वारे याचिका केली आहे. त्यावर राष्ट्रपतींचा निर्णय प्रतिक्षेत आहे. चौथा आणि शेवटचा पर्याय म्हणजे गांधीगिरी अर्थात तुरुंगातली वर्तणूक... तुरूंगात गेल्यावर तिथल्या कामात तुरूंग प्रशासनाला मदत केल्यास, चांगली वर्तणूक ठेवल्यास त्याची शिक्षा एक महिन्यानं कमी होऊ शकते. शिवाय त्याला कैदी हक्कानुसार तत्काल सुट्टी मिळाली तर त्याची शिक्षा ९ महिने आणि २१ दिवसांनी कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त ९० दिवसांचा पॅरोलचा पर्याय संजय दत्तसमोर आहे.