www.24taas.com, नवी दिल्ली/मुंबई
आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात खाप पंचायतीच्या निर्णयांविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अब्दुल हकिम याला २२ सप्टेंबर रोजी आपला प्राणाला मुकावं लागलं होतं. त्यानंतर ‘ऑनर किलिंग’ला बळी पडलेल्या अब्दुलला न्याय मिळवून देण्यासाठी आता आमिर खान पुढं सरसावलाय.
अभिनेता आमिर खान याचा ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम बराच गाजला. या कार्यक्रमात उठवण्यात आलेल्या मुद्यांवरही बरीच चर्चा झाली. याच कार्यक्रमात पाचव्या एपिसोडमध्ये प्रेम विवाह, खाप पंचायत आणि ऑनर किलिंग या मुद्द्यांवर अनेक घटना समोर आल्या. यामध्येच हकिम आणि महविश या दोघांचाही सहभाग होता. दोघांनीही प्रेमविवाह केला होता. कार्यक्रमासाठी या दोघांची अगोदर मुलाखत घेण्यात आली होती. यामध्ये आपल्या जीवाला धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. पण, कार्यक्रम प्रसरणादरम्यान ही संपूर्ण मुलाखत दाखवता आली नाही. २२ नोव्हेंबर रोजी उत्तरप्रदेशमधल्या बुलंदशहरातील एक गावात अब्दुल हकिमची गोळी मारून हत्या करण्यात आली. नऊ महिन्यांच्या आपल्या गरोदर पत्नीसाठी अब्दुल मेडिकलमधून औषधं घेऊन येत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता.
अब्दुलच्या हत्येची बातमी समजल्यानंतर आमिर खान हैराण झालाय तितकाच तो निराशही झालाय. ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आमिरनं दिलीय. हकिमला आणि त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी मदत करण्याचंही आश्वासन आमिरनं यावेळी दिलंय. 'सत्यमेव जयतेसाठी चित्रित करण्यात आलेल्या अब्दुलच्या मुलाखतीची टेप पोलिसांनी मागितल्यास ती उपलब्ध करून देऊ' असं आमिरनं म्हटलंय. बुलंदशहरचे डीएम तसंच एसएसपी यांच्यासोबतच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याबरोबरही आपण यासंबंधी चर्चा करणार असल्याचं आमिरनं म्हटलंय. सध्या आमिर त्याच्या आगामी ‘तलाश’ चित्रपटच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
दरम्यान, हकिमची हत्या करण्याच्या आरोपावरून आत्तापर्यंत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यापैकी फक्त एकाला अटक झालीय. प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून खाप पंचायतीनं हकिम आणि त्याच्या पत्नीला ठार मारण्याचा आदेश दिले होते. त्यामुळे ही दोघंही दिल्लीमध्ये राहत होते. एसएसपीकडून सुरक्षेचं आश्वासन मिळाल्यानंतर हे दोघेही गावात दाखल झाले होते. पत्नी महाविशच्या म्हणण्यानुसार तिच्या माहेरच्या लोकांनीच अब्दुलची हत्या केलीय. तसंच तिच्या स्वत:च्या जीवालाही धोका आहे.