क्रिकेट सामन्यादरम्यान जाहिराती आऊट? बीसीसीआयला धक्का

जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयला हा धक्का असू शकतो. 

Updated: Jan 7, 2016, 08:27 PM IST
क्रिकेट सामन्यादरम्यान जाहिराती आऊट? बीसीसीआयला धक्का title=

मुंबई : न्या. आर. एन. लोढा समितीने केलेल्या शिफारशींमुळे टेलिव्हिजनमध्ये क्रिकेट मार्केटला जोरका झटका बसू शकतो. जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआयला हा धक्का असू शकतो. 

क्रिकइन्फोच्या एका अहवालानुसार या शिफारशीची अंमलबजावणी झाल्यास षटक संपल्यानंतर ब्रेकमध्ये कोणतीही जाहिरात दाखविली जाणार नाही. कारण न्या. लोढा समितीच्या या शिफारशींची अंमलबजावणी झाली, तर टेलिव्हिजनवरील क्रिकेट प्रक्षेपणाच्या मार्केटला जबरदस्त झटका बसू शकतो.

आर्थिक बाबीने क्रिकेट खेळातील रोमहर्षकता आणि आनंदावर कसा कब्जा केला आहे, हे लोढा समितीने स्पष्ट केले. भारतात कसोटी आणि एकदिवसीय सामन्याच्या प्रक्षेपणादरम्यान प्रत्येक षटकानंतर जाहिराती दाखविल्या जातात आणि अनेकदा तर जाहिराती सुरू असताना महत्त्वाचा एखाद-दुसरा चेंडू पाहण्याची संधीही हुकते, असे न्या लोढा समितीने अहवालात म्हटले आहे.  

कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यादरम्यान टेलिव्हिजनवरील प्रक्षेपणादरम्यान प्रत्येक षटकानंतर येणाऱ्या जाहिरातीवर बंदी आणायला हवी आणि सामन्यातील ड्रिंक्स, लंच आणि चहापानादरम्यानच जाहिराती दाखविण्यात याव्यात.

आंतरराष्ट्रीय कसोटी, एकदिवसीय सामन्यात आणि नवीन कॉन्ट्रॅक्टमध्ये दोन्ही संघांच्या ब्रेक, लंच आणि चहापानादरम्यानच टीव्हीवर जाहिराती प्रक्षेपित केल्या जाव्यात, त्याचबरोबर टीव्हीच्या पूर्ण स्क्रीनला सामना प्रक्षेपणाच्या डिस्प्लेसाठी ठेवले जावे, असे समितीने दिलेल्या अहवालात नमूद आहे.