कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार अशा बातम्या आल्यानंतर सौरव गांगुलीने हे स्पष्टीकरण दिलं आहे.
हे स्पष्टीकरण देतांना सौरव गांगुली म्हणाला, मला यासंदर्भात भाजपकडून विचारणा करण्यात आली होती. मात्र, मी त्यांचा प्रस्ताव नाकारल्याचे गांगुलीने पत्रकारांसमोर स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून गांगुली भाजपमध्ये सहभागी होणार असल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
भाजपने माझ्यासमोर पक्षातर्फे लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, मला निवडणूक लढविण्यात कोणतेही स्वारस्य नसल्यामुळे मी प्रस्ताव नाकारला, असे गांगुलीने सांगितले.
पश्चिम बंगाल हा तृणमुल काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या ठिकाणी भाजप अधिक मजबूत करण्यासाठी गांगुलीला पक्षातर्फे उमेदवारी देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न होता. यापूर्वी तृणमुल काँग्रेसचे नेते दिनेश त्रिवेदीही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र सौरव गांगुलीच्या स्पष्टीकरणानंतर ममता दीदी आणि सौरव गांगुली यांच्यातला राजकीय सामना होणारच नसल्याची चिन्हं आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.