अलिबाग : सातबाऱ्यावर नाव चढविण्यासाठी ५० हजाराची लाच प्रकरणी पनवेलचा नायब तहसीलदार आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बॉडीबिल्डर सुहास खामकर आणि त्याचा साथीदार गणेश भोगाडे याला न्यायालायाने सात ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पनवेल तालुक्यातील पेंधर येथील एका जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव नोंदणी करण्यासाठी जमिनीच्या मालकाकडून खामकरने त्याचा सहाय्यक गणेश भोगाडे याच्या माध्यमातून ६० हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचेच्या रकमेपैकी ५० हजाराची लाच घेताना गणेश भोगाडे आणि सुहास खामकर यांना सोमवारी रायगडच्या लाचलुचपत विभागाने पकडले होते. आज दुपारी दोघा आरोपींना अलिबाग येथील विशेष न्यायालयात हजर केले असता त्यांना सात ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले. यावेळी खामकर याच्या चाहत्यांसह स्थानिका लोकांनीही कोर्टात गर्दी केली होती.
दरम्यान, बॉडीबिल्डरांमधील वादामुळे मला लाचखोरी प्रकरणात अडकविण्यात आल्याचे सुहास खामकर याने स्पष्ट केले आहे. हा जो प्रकार झाला आहे, त्यात माझा काडीमात्र संबंध नाही, या प्रकरणात मला पद्धतशीरपणे अडकविण्यात आले आहे. प्रसारमाध्यमातून सुहास खामकरने लाच घेतली हे दाखविले जात आहे ते जनतेची दिशाभूल करणारे आहे. पोलिसांनी काय लिहले आहे ते पाहा आणि मग त्यावरून बातम्या द्याव्या असे आवाहन सुहास खामकरने केले आहे.
माझ्या विरोधकांना वाटत असेल असे काही प्रकार केल्यानंतर सुहास खामकर संपेल, सुहास खामकरचं खच्चीकरण केले जाईल ते त्यांचा समज चुकीचा आहे. यापुढे मी जोमाने काम करेल आणि माझ्या देशाचं आणि महाराष्ट्राचं नाव पुढे घेऊन जाईल, असे सुहासने सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.