नॉटिंगहॅम : इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू लियम प्लंकेटने शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकून श्रीलंकेविरुद्धची वन डे मॅच अनिर्णित राखण्यात यश मिळविले.
इंग्लंडचा कर्णधार इयान मॉर्गनने टॉस जिंकून प्रथम श्रीलंकेला बॅटिंग दिली. श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज (७३) आणि सिक्कुगे प्रसन्ना (५९) यांच्या अर्धशतकी खेळामुळे श्रीलंकेने इंग्लंडसमोर २८७ रन्सचे आव्हान ठेवले. इंग्लंडकडून ख्रिस वोक्स, डेव्हिड व्हिली आणि प्लंकेटने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. मॅथ्यूजने १०९ चेंडूत केलेली ७३ रन्स केल्या. प्रसन्नाने फटकेबाजी करत केवळ २८ चेंडूत ५९ रन्स केल्या. त्याने आठ चौकार व चार सिक्स ठोकलेत.
इंग्लंडची सुरुवात खराब झाली. केवळ तीन रन्सवर जेसन रॉय एलबीडब्ल्यू झाला. त्यानंतर अॅलेक्स हेल्सही ७ रन्सवर पॅव्हेलियनमध्ये परतला. इंग्लंडच्या ४ विकेट केवळ ३० रन्समध्ये गेल्यात. कर्णधार मॉर्गनने ४३ रन्स करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. अखेर यष्टीरक्षक बटलर (९३) आणि वोक्स (९५) रन्सची खेळत टीमला विजयाकडे नेले. शेवटच्या ओव्हरमध्ये नुआन प्रदीपच्या शेवटच्या बॉलवर प्लंकेटने सिक्स खेचून श्रीलंकेचा तोंडातील विजय हिरावून घेतला. प्लंकेटने ११ बॉलमध्ये २२ रन्स केल्यात.