लंडन : इंग्लंडचा शैलीदार फलंदाज जोनाथन ट्रॉट याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. वेस्ट इंडीजविरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांमधील निराशाजनक कामगिरीनंतर त्याने हा निर्णय जाहीर केला.
आपल्या निवृत्तीविषयी बोलतांना ट्रॉट म्हणाला, "हा निर्णय अवघड आहे, पण इंग्लंडकडून खेळताना ज्या दर्जाची अपेक्षा असते, तसा खेळ माझ्याकडून होत नव्हता. इतक्या महिन्यांनी पुनरागमनाची संधी मिळाल्याचा आनंद होता; पण त्याला साजेशी कामगिरी मी करू शकलो नाही".
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत सलामीवीर म्हणून खेळलेल्या ट्रॉटला सहा डावांत केवळ ७२ धावा केल्या. त्यातही, पाच डावांमध्ये तो केवळ एक आकडी धावाच करू शकला होता. तीन सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत संपुष्टात आली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २०१३-१४ मधील ऍशेस मालिकेनंतर आजारपणामुळे ट्रॉट संघाबाहेर होता. २०१४ मध्ये त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ४७.६९ च्या सरासरीने धावा केल्या. त्यानंतर त्याला वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळाले. त्याने तब्बल १६ महिन्यांनंतर पुनरागमन केले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी पदार्पणातच ट्रॉटने शतक झळकावून दर्जा दाखवून दिला होता. २०११ मधील ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यामध्ये ट्रॉटने ८९ च्या सरासरीने ४४५ धावा करत ऍशेस राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
जोनाथन ट्रॉट
वय : ३४ वर्षे,
कसोटीतील कामगिरी
५२ सामने, ३८३५ धावा, ९ शतके, १९ अर्धशतके, सर्वाधिक २२६
वनडेमधील कामगिरी
६८ सामने, २८१९ धावा, ४ शतके, २२ अर्धशतके, सर्वाधिक १३७
ट्वेंटी-२० मधील कामगिरी
७ सामने, १३८ धावा, १ अर्धशतक, सर्वाधिक ५१, स्ट्राईक रेट ९५.८३
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.