रांची : भारताने तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आपली मजबुत पकड निर्माण केली आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची २ बाद २३ अशी अवस्था झाली आहे.
चेतेश्वर पुजाराने द्विशतकी खेळीदरम्यान खेळपट्टीवर उभा राहण्याचा विक्रम केला, तर रिद्धिमान साहाने झुंजार शतक झळकाविले. यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी १५२ धावांची आघाडी घेतली आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाच्या ४५१ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना पहिला डाव ९ बाद ६०३ धावसंख्येवर घोषित केला. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने (सहा धावांत २ बळी) त्यानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (१४) व नाईट वॉचमन नॅथन लियोन (२) यांचा त्रिफळा उडवून ऑस्ट्रेलियाचा डाव अडचणीत आणला.
ऑस्ट्रेलियाचा संघ अद्याप १२९ धावांनी मागे असून त्यांच्या ८ विकेट शिल्लक आहेत. रविवारी चौथ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी मॅट रेनशॉ ७ धावा काढून खेळपट्टीवर होता.